


हैद्राबाद, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील मनुगुरु भागात रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बीआरएस (भारत राष्ट्र समिती) च्या स्थानिक कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली. या दरम्यान त्यांनी फर्निचर जाळले आणि काँग्रेसचा झेंडा फडकावला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये काँग्रेसचे झेंडे हातात घेतलेले कार्यकर्ते घोषणाबाजी करत बीआरएस कार्यालयात घुसताना दिसत आहेत. या हाणामारीत दोन्ही गटांमध्ये जोरदार संघर्ष झाला असून काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. तथापि, पोलिसांनी अद्याप जखमींची अधिकृत दुजोका दिलेला नाही.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी “आम्हाला आमचे कार्यालय परत द्या” अशा घोषणा देत निदर्शने केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, बीआरएसच्या सत्ताकाळात त्यांचे जुने कार्यालय जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन आमदाराने पोलिसांच्या संरक्षणात काँग्रेसचे कार्यालय कब्जा करून त्याला बीआरएसचा गुलाबी रंग दिला होता. “हे आमचेच कार्यालय आहे आणि आम्ही ते परत घेतले,” असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
या घटनेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी बीआरएस कार्यालयातील साहित्य बाहेर काढून त्यास आग लावली. यादरम्यान एका बीआरएस कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचाही आरोप आहे. दुसरीकडे बीआरएसने या घटनेला “गुंडगिरी”चे उदाहरण म्हणत काँग्रेसवर टीका केली. बीआरएसने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “काँग्रेस दबाव आणि दडपशाहीच्या राजकारणाचा अवलंब करत आहे. अशा गुंडगिरीने जनतेला घाबरवण्याचा प्रयत्न केला तर जनता उत्तर देईल.”
बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव (केटीआर) यांनी या घटनेला सध्याच्या काँग्रेस सरकारच्या “कायदा-सुव्यवस्थेच्या अपयशाचे आणि गुंडराजचे” उदाहरण म्हटले. त्यांनी स्पष्ट केले की, “बीआरएस कुटुंबातील ६० लाख कार्यकर्ते मनुगुरूतील आमच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत. काँग्रेसच्या गुंडांना घाबरण्याची गरज नाही; त्यांचा अहंकार फार काळ टिकणार नाही.”मनुगुरूमधील हे काँग्रेस कार्यालय जुलै २०२० पर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होते. त्यानंतर तत्कालीन काँग्रेस आमदार रेगा कांता राव बीआरएसमध्ये सामील झाल्यानंतर या कार्यालयाचे रूपांतर बीआरएस कार्यालयात झाले. त्यावेळी काँग्रेस नेते भट्टी विक्रमर्क यांनी या कारवाईविरोधात निषेध नोंदवला होता आणि महापालिकेच्या नोंदींनुसार ही इमारत काँग्रेसचीच मालमत्ता असल्याचा दावा केला होता.
२०२३ च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ११९ पैकी ६४ जागा जिंकून बहुमत मिळवले, तर सत्ताधारी बीआरएसला ३९ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जुन्या वादग्रस्त कार्यालयाच्या ताब्याबाबतचा संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule