दाही दिशा : डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विचारप्रवासाचे प्रेरणादायी प्रतिबिंब
* शब्दांच्या माध्यमातून समाजजागृतीचा दीप – “दाही दिशा” पुस्तक प्रकाशन सोहळा मुंबई, 2 नोव्हेंबर (हिं.स.) - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित “दाही दिशा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वा
दाही दिशा डॉ. नीलम गोऱ्हे


दाही दिशा डॉ. नीलम गोऱ्हे


* शब्दांच्या माध्यमातून समाजजागृतीचा दीप – “दाही दिशा” पुस्तक प्रकाशन सोहळा

मुंबई, 2 नोव्हेंबर (हिं.स.) - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित “दाही दिशा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील यशोदर्शन सभागृहात पार पडणार आहे. शब्द आणि विचारांचा संगम अनुभवांच्या प्रवासातून जेव्हा साकारतो, तेव्हा जन्म घेतो एक सजीव आणि प्रेरणादायी ग्रंथ — “दाही दिशा”.

या पुस्तकातून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रवास, त्यांच्या नेतृत्वक्षमतेचा ठसा, तसेच समाजातील त्यांच्या भूमिकेचा सखोल अर्थ उजागर केला आहे. “दाही दिशा” या पुस्तकामध्ये सहा प्रेरणादायी प्रकरणांचा समावेश असून त्यात, ‘चळवळीसह शिक्षण’, ‘शहरातून गावाकडे’, ‘पुन्हा शहराकडे’, ‘माध्यमांमधले स्त्री-चित्रण’, ‘चळवळीकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन’ आणि ‘भगिनीभाव’ या विषयांवर सखोल चिंतन करण्यात आले आहे. या प्रकरणांतून स्त्रीशक्ती, सामाजिक परिवर्तन, आणि संवेदनशील नेतृत्व या तीन प्रवाहांचा सुंदर संगम दिसून येतो.

या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या सोहळ्याला चंद्रकांत पाटील (मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग), उदय सामंत (मंत्री, उद्योग व मराठी भाषा विभाग), अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.

“दाही दिशा” हे केवळ आत्मकथन नसून, ते डॉ. गोऱ्हे यांच्या सामाजिक बांधिलकीचे, स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीकोनाचे आणि संवेदनशील नेतृत्वाच्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण आहे. यात त्यांनी महाराष्ट्रातील महिला चळवळींचा अनुभव, ग्रामीण ते नागरी जीवनातील संक्रमण, माध्यमांतील स्त्रीप्रतिमांचा बदल आणि स्त्रीपुरुष सहकार्याच्या नात्याचे सामाजिक भान अशा विविध अंगांनी प्रकाश टाकला आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे यांचा साहित्य प्रवास अत्यंत समृद्ध आणि समाजकेंद्री आहे. त्यांनी आजवर ३० हून अधिक पुस्तकांचे लिखाण केले असून, हे साहित्य सामाजिक चळवळ, कायदा, महिला प्रश्न, राजकारण आणि संवेदनशील समाजनिर्मितीच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांच्या उल्लेखनीय पुस्ताकांमध्ये “स्त्रिया व कायदा”, “महिलांसंबंधी धोरण – स्वयंसिद्धतेकडे वाटचाल” (१९९४), “पीडित महिलाओं की सहेली”, “पंचायतराज मार्गदर्शक”, “अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण”, “महिला मंडळ मार्गदर्शक”, “उरल्या कहाण्या”, “नारीपर्व”, “कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा: स्वरूप व कार्यपद्धती”, “महिला आणि समाज”, तसेच “भिंतीमागचा आक्रोश (महिलांचा अनैतिक व्यापार)” यांचा समावेश आहे.

तसेच, “स्त्रिया समान भागीदार (सीडॉ करार)”, “जागतिक महिला आंदोलनाचा वेध (२००३–२००८)”, “स्त्री-पुरुष समानता; महिला विषयक धोरणे”, “स्त्री-पुरुष समानता; पोलीस मार्गदर्शक”, “स्त्री प्रश्नांचा वेध”, “समानतेकडून विकासाकडे: शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख आणि आव्हाने”, “माणूसपणाच्या वाटेवर”, आणि “शरीराची ओळख” या त्यांच्या पुस्तकांमधून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा, समतावादी विचारांचा आणि महिलांच्या स्वायत्ततेच्या प्रवासाचा वेध घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी “Girl Child in Oblivion”, “Wail Behind the Wall (Immoral Trafficking of Women)”, “Women in Decision Making”, “Status of Family Courts in Maharashtra” आणि “Lonely Path to Development (Earthquake in Latur 1993)” यांसारखी इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत.

शिवसेनेतील त्यांच्या योगदानावर आधारित “शिवसेना योजना कक्ष” (2000), “प्रवास एका संघर्षाचा”, “शिवसेनेतील माझी २० वर्षे” आणि “शिवसेनेतील निवडक भाषणे (२००५–२०११)” ही पुस्तके त्यांच्या राजकीय प्रवासाचे आणि सामाजिक चळवळीतल्या नेतृत्वाचे प्रतीक आहेत.

तसेच विधानपरिषद कामकाजातील त्यांच्या सहभागावर आधारित “विधानपरिषद व माझे कामकाज”, “विधानपरिषद कामकाज माझा सहभाग, खंड १ – कायदा-सुरक्षा (२००७–२०१३)” आणि “विधानपरिषद कामकाज माझा सहभाग (२००७–२०१३)” ही पुस्तके त्यांच्या विधायक कार्याचा साक्षीदार ठरतात.

डॉ. गोऱ्हे यांच्या जीवनकार्यावर आधारीत “अपराजिता – डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सामाजिक कर्तृत्वाची संघर्षगाथा” (लेखिका – अंजली कुलकर्णी) आणि “ऐसपैस गप्पा नीलम ताईंशी” (लेखिका – करुणा गोखले) ही पुस्तके त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि सामाजिक वाटचालीचा सखोल मागोवा घेतात.

“दाही दिशा” या पुस्तकाद्वारे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शब्दांना समाजजागृतीचे सामर्थ्य दिले असून, स्त्रीशक्तीच्या प्रबोधनाचा आणि समाजातील न्याय्य समतोल निर्माण करण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचविला आहे. हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या विचारप्रवासाचा, संवेदनशीलतेचा आणि नेतृत्वगुणांचा साक्षात आरसा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande