
कॅनबेरा, 2 नोव्हेंबर (हिं.स.)होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल येथे भारताने यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार पुनरागमन केले आणि त्यांना पाच विकेट्सने पराभूत केले. पर्थमधील पहिला सामना रद्द झाल्यानंतर, यजमान संघाने एमसीजीवरील दुसऱ्या सामन्यापर्यंत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण रविवारी वॉशिंग्टन सुंदरच्या शानदार कामगिरीमुळे भारताने विजय मिळवला आणि मालिकेत बरोबरी साधली.
विजयासाठी १८७ धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा (२५) आणि शुभमन गिल (१५) यांनी भारताला जलद सुरुवात दिली होती. पण ते त्याचे रूपांतर मखोठ्या खेळीत करू शकले नाहीत. कर्णधार सूर्यकुमार यादव (२४) आणि तिलक वर्मा (२९) देखील मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. पण चांगली गोष्ट म्हणजे दोघांनीही आवश्यक सरासरी राखली. अक्षर पटेल (१७) स्वस्तात बाद झाला. पण तिथून, वॉशिंग्टन सुंदर (नाबाद ४९, २३ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार) ने आपला खेळ उंचावला. आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील त्याने सर्वोत्तम खेळी केली . संजू सॅमसनच्या जागी आलेल्या यष्टीरक्षक जितेश शर्माने (नाबाद २२, १३ चेंडू, ३ चौकार) चांगली साथ दिली. परिणामी, भारताने ९ चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले. नॅथन एलिसने ३ विकेघट्स घेतल्या.तर बार्टलेट आणि स्टोइनिसने प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत १८६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून टिम डेव्हिड आणि मार्कस स्टोइनिसने अर्धशतक झळकावले. टिम डेव्हिडने ३८ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकार मारले, तर स्टोइनिसने ३९ चेंडूत ६४ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने ३ आणि वरुण चक्रवर्तीने विकेट्स घेतल्या. भारताची सुरुवात चांगली झाली, पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने जबाबदारी सांभाळली. त्यानंतर टिम डेव्हिड आणि स्टोइनिसने कांगारुंचा डाव सावरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे