
नवी मुंबई, 2 नोव्हेंबर (हिं.स.)भारताने ५० षटकांत 7 विकेट्स गमावत २९८ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २९९ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून दीप्ती शर्मा आणि शफाली वर्माने अर्धशतके झळकावली. तर रिचा घोषने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत भारताला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली.
एकेकाळी असे वाटत होते की, भारतीय संघ ३५० धावांपर्यंत पोहोचेल. पण मधल्या फळीत झालेल्या घसरगुंडी आणि संथ फलंदाजीमुळे ते होऊ शकले नाही आणि भारतीय संघ फक्त ३०० धावांच्या जवळ पोहोचू शकला. महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे आणि विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे. २०२२ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 बाद ३५६ धावा केल्या होत्या. तथापि, दक्षिण आफ्रिकेला विक्रमाचा पाठलाग करावा लागेल. महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यात आला नव्हता.
भारताकडून दीप्ती शर्माने ५८ धावा आणि शफाली वर्माने ८७ धावा केल्या. स्मृती मानधनानेही ४५ धावा केल्या. दरम्यान, रिचा घोषने २४ चेंडूत ३४ धावांची तुफानी खेळी केली. जेमिमा रॉड्रिग्ज २४ धावांवर आणि कर्णधार हरमनप्रीत कौर २० धावांवर बाद झाली. अमनजोत कौरने १२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने तीन विकेट्स घेतल्या. मलाबा, डी क्लार्क आणि क्लो ट्रायॉनने प्रत्येकी एकेक विकेट घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे