
रायगड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। म्हसळा तालुक्यातील बनोटी गावात कार्तिकी एकादशीचा सोहळा मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. “पांडुरंगाच्या दारी... उभा वारकरी” अशी भावविभोर घोषणा देत गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिर परिसरात जणू पंढरपूरच अवतरल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
या निमित्ताने मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विठ्ठल-रखुमाई मूर्तींवर दुग्धाभिषेक करण्यात आला. दिवसभर भजन, कीर्तन, नामस्मरण, तसेच महादिंडी आणि पालखी मिरवणुकीने वातावरण भक्तिमय झाले होते. संध्याकाळी पारंपरिक शक्ती तुरा जंगी सामन्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
या सोहळ्याला माजी सभापती रविंद्र लाड, शिवसेना तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, उपतालुका प्रमुख बाबु बनकर, युवा प्रमुख स्वप्नील चांदोरकर, साळविंडे विभाग प्रमुख नामदेव घुमकर, ज्येष्ठ पत्रकार उदय कळस, तसेच दैनिक सूर्योदय चे उपसंपादक संतोष उध्दरकर, शहर प्रमुख पवन भोई आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे गावकऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आमदार भरतशेठ गोगावले यांनी विशेष सहकार्य केले असून, त्यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या. सोहळ्याचे आयोजन अध्यक्ष देवजी गाणेकर, सचिव उत्तम गाणेकर, खजिनदार देवीदास गाणेकर, सल्लागार प्रसाद, चंद्रकांत, सचिन, चंदन आणि जयेश गाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महिला मंडळ आणि तरुणाईच्या उत्साही सहभागामुळे बनोटी गावात या एकादशीला खऱ्या अर्थाने “पंढरीच्या वैभवाची” झलक अनुभवायला मिळाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके