
नाशिक, 2 नोव्हेंबर (हिं.स.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे एन डी सी ए ग्राउंडसमनच्या अथक मेहनती मुळे सुरु झालेल्या महाराष्ट्र व सौराष्ट्र या चार दिवसीय रणजी ट्रॉफीच्या सामन्यास दुसऱ्या दिवशी चहापानानंतर सुरुवात झाली. दुसऱ्या दिवसअखेर अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा सौराष्ट्रच्या १ बाद ६२ धावा झाल्या.
परवा शुक्रवारी रात्री पडलेला पाऊस , शनिवारी दिवसभर बहुतांश वेळ राहिलेले ढगाळ हवामान व एक दोन वेळा पावसाच्या हलक्या सरी आल्यामुळे पहिल्या दिवशी खेळ सुरू होऊ शकला नव्हता. पुन्हा शनिवारी दुपारनंतर जोराचा पाऊस झाल्याने रविवारी देखील मैदान ओले होते. पण पुण्याहून या सामन्यासाठी खास आलेले बीसीसीआयचे खेळपट्टी तज्ञ -क्यूरेटर- फाळके व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे शेखर घोष यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली एन डी सी एचे ग्राउंडसमन सह एकूण २५ कर्मचारी मैदान खेळण्या योग्य करण्यासाठी अथक प्रयत्न करत राहिले. भरपूर रोलिंग, पावसाची शंका येताच सारखे धावत पळत मैदान झाकणे, सूर्यप्रकाश येताच आवरण परत काढून टाकणे. अगदी घमेल्यात पेटते लाकूड- विस्तव ठेऊन ठराविक जास्त ओल असलेल्या ठिकाणी त्यापासूनची उष्णता देत त्यांनी मैदान सुकवले. त्यामुळेच भरपूर वाट पहावी लागलेले नाशिककर क्रिकेट प्रेमी व दोन्ही संघ खुश झाले . दोन्ही पंचांनी दर तासाला आढावा घेत, तिसऱ्या सत्रात चहापानानंतर तीन वाजता नाणेफेक करून साडेतीन वाजता सामना सुरू केला.
महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. साधारण तासभराच्या खेळात १२ षटकांत सौराष्ट्रने १ बाद ६२ धावा केल्या. जलदगती डावखुरा मुकेश चौधरीने त्याच्या तिसऱ्याच षटकात सलामीवीर चिराग जानीला १३ धावांवर पायचीत करून तंबूत परत पाठवले. १ बाद २६. त्यानंतर सलामीवीर यष्टीरक्षक हार्विक देसाई व जय गोहिलने दिवसअखेर १२ षटकात धावसंख्या १ बाद ६१ पर्यंत नेत अधिक पडझड होऊन दिली नाही.
रविवारी सामना दुपारनंतर सुरू झाला मात्र सायंकाळी नाशिकमध्ये हलकासा पावसाला सुरुवात झाली आहे हा पाऊस वाढण्याची शक्यता हवामान तज्ञ व्यक्त करत आहे त्यामुळे सोमवारी पुन्हा खेळ सुरू होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV