

मुंबई, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रदर्शित झाला. या वेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, “हा सिनेमा महाराष्ट्र उचलून धरेल, चित्रपट धरून ठेवेल,” असं सांगत त्यांनी या चित्रपटाचं विशेष कौतुक केलं होतं.
आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करून या चित्रपटाबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिलं, “मी दोन दिवसांपूर्वी माझे मित्र आणि उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट पाहिला. समकालीन सिनेमा हा शब्द अनेकदा वापरला जातो, पण खरा समकालीन सिनेमा पाहायचा असेल तर या चित्रपटाला पर्याय नाही.”
राज ठाकरे पुढे म्हणतात की, “आज फक्त मोठे महामार्ग, पूल आणि चमकदार घोषणा म्हणजे विकास असं सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिलं आहे. यात कोणाचा विकास होतो की नाही माहीत नाही, पण सत्ताधाऱ्यांचा विकास मात्र निश्चित होतो. धर्माच्या नावाखाली लोकांना आंधळं केलं जातं आणि शेतकरी असो वा मराठी माणूस, त्यांना वापरून टाकलं जातं.”
शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्रातला शेतकरी आज हतबल झाला आहे. एका बाजूला पावसाचं संकट आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणेची अनास्था. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य उभारलं, पण आज त्याच शेतकऱ्याचा मुलगा आत्महत्या करतो, हे राज्याचं दुर्दैव आहे.”
मराठी माणसांच्या स्थितीवर भाष्य करताना त्यांनी म्हटलं, “ग्रामीण भागातील शेतकऱ्याला जमीन विकावी लागते, तर शहरात मराठी माणसांना घरं नाकारली जातात. त्यांच्या भाषेचा अपमान केला जातो, आणि बाहेरून आलेल्यांना अभय दिलं जातं. मराठी माणसाला हे सगळं दिसत नाही का? दिसत असेल तर त्याच्या मनात याविरोधात चीड निर्माण व्हायला हवी. तोपर्यंत परिस्थिती बदलणं शक्य नाही.”
शेवटी राज ठाकरे म्हणाले, “या सिनेमातून महेश मांजरेकर आणि त्यांच्या टीमनं मराठी माणसाच्या मनातील अस्वस्थता प्रभावीपणे मांडली आहे. हा फक्त चित्रपट नाही, तर महाराष्ट्राच्या अस्वस्थतेचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे माझं आवाहन आहे की ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसानं जरूर पाहावा.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule