
रत्नागिरी, 2 नोव्हेंबर, (हिं. स.) : २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी कार्यालयाकडुन मेनु-२६ वार्षिक प्रशिक्षण शिबिर राबविण्यात येत असून, त्यामध्ये एकूण ६० राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुलामुलींचा सहभाग आहे. या शिबिराचा कालावधी १० ते १९ नोव्हेबर दरम्यान आहे.
शिबिराला रत्नागिरीतून प्रारंभ होत असून, रनपार, पावस, पूर्णगड, आंबोळगड, जैतापूर, विजयदुर्ग आणि परत त्याच मार्गाने रत्नागिरी येथे शिबिर समाप्त होणार आहे. शिबिराचे प्रमुख सुत्रधार कमांडर रामांजुल दीक्षित, समादेशक अधिकरी २ महा नेव्हल युनिट एनसीसी यांच्या निरीक्षण व मार्गदर्शनाखाली होणार आहे. शिबिरासाठी रत्नागिरी, मुंबई, पुणे, नागपूरमधून राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट सहभागी होत आहेत.
या दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येणार असून स्वच्छतेबाबत जनजागृती अभियान स्वच्छ कोकण, समुद्र कोकण, सुंदर कोकण यावर आधारित पथनाट्यातून राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटमार्फत सागरी किनारे स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे. तसेच रॅप्लिग, ट्रेकिंग, अॕडव्हेन्चर अॕक्टिव्हिटी, पथनाट्य असे विविध उपक्रम होणार आहेत.
या कॅम्प मध्ये २ भारतीय नौसेना अधिकारी, २ एनसीसी अधिकारी, २ गर्ल्स कॅडेट इन्सक्टर, १ नौका प्रतिमान निर्देशक, ११ भारतीय नौसेना कर्मचारी, १ आर्मी वैदयकीय कर्मचारी ८ राज्य शासकीय कर्मचारी स्टाफ, व राष्ट्रीय छात्र सेनाचे ३० मुले व ३० मुलींचा सहभाग असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी