

देहरादून, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज हरिद्वार, उत्तराखंड येथे पतंजली विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला.
या प्रसंगी भाषण करताना राष्ट्रपतींनी सांगितले की, भारतातील महान व्यक्तिमत्वांनी मानव संस्कृतीच्या विकासात अमूल्य योगदान दिले आहे. महान ऋषी पतंजली यांनी योगासनांद्वारे मनातील, व्याकरणाद्वारे वाणीतील आणि आयुर्वेदाद्वारे शरीरातील अशुद्धी दूर केली. पतंजली विद्यापीठ समाजापर्यंत महर्षि पतंजलि यांच्या महान परंपरेचा प्रसार करीत असल्याबद्दल त्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.राष्ट्रपतींनी नमूद केले की, पतंजली विद्यापीठ योग, आयुर्वेद आणि नैसर्गिक चिकित्सा या क्षेत्रांमध्ये शिक्षण आणि संशोधन पुढे नेत आहे. त्यांनी म्हटले की, हे प्रशंसनीय प्रयत्न असून या माध्यमातून निरोगी भारत घडविण्यासाठी उपयोग होत आहे.
राष्ट्रपतींनी पतंजली विद्यापीठाच्या भारतकेंद्रित शैक्षणिक दृष्टिकोनाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, वैश्विक बंधुभावाच्या भावनेने प्रेरित शिक्षण, प्राचीन वैदिक ज्ञान आणि अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधन यांचे एकत्रीकरण, तसेच जागतिक आव्हानांचे निराकरण, हे सर्व आधुनिक काळात भारतीय ज्ञानपरंपरेला पुढे नेत आहेत.राष्ट्रपतींनी सांगितले की, या विद्यापीठाच्या आदर्शांनुसार शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना हे निश्चितच जाणवले असेल की, पर्यावरणाचे संरक्षण आणि निसर्गाशी सुसंगत जीवनशैली अवलंबणे हे मानवजातीच्या भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, हे विद्यार्थी हवामान बदलासह सर्व जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यास नेहमी तत्पर राहतील.राष्ट्रपतींनी विश्वास व्यक्त केला की, या विद्यापीठाचे विद्यार्थी आपल्या सदाचरणाने एक निरोगी समाज आणि विकसित भारत घडविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule