



* आमचा अजेंडा राज्याच्या विकासाचा, आगामी निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकेल
पंढरपूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.) - “आम्ही काम केले आहे, जनता पाहते आहे. आंदोलने-मोर्चे काढून सत्ता मिळत नाही; महाराष्ट्रात विकास करणाऱ्यांनाच जनता साथ देते.” राज्याच्या विकासाचा चेहरा आणि जनतेला दिलेल्या वचनांची आठवण करून देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरातून आज विरोधकांवर थेट राजकीय प्रहार केला.
कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतल्यानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांवर निशाणा साधला आणि सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला. याप्रसंगी त्यांच्यासोबत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री असताना आम्ही अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या. बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले. महायुती सरकारने विकासकामांना गती दिली असून अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. महायुती सरकारची दुसरी इनिंग सुरू आहे. राज्यातील जनतेला विकास कोणी केला हे स्पष्ट माहीत आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही मोर्चे-आंदोलने काढली तरी आमच्या विजयावर परिणाम होणार नाही. आमचा अजेंडा महाराष्ट्राच्या विकासाचा आहे.” असे जोरदार प्रत्युत्तर देत त्यांनी विरोधकांच्या मोर्चातील हवा काढून टाकली.
कार्तिकी एकादशीच्या पूजनाचा मान मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शिंदेंनी शेतकरी, कष्टकरी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण सुख-समृद्धीसाठी विठ्ठल चरणी प्रार्थना केली.
ते पुढे म्हणाले, “महायुती सरकारने जनतेचा विश्वास जिंकला आहे. विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळाले आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही जनता आमच्या पाठीशी ठाम उभी राहील.” महायुतीचा भगवा झेंडा फडकेला असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले, “शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी 32 हजार कोटींचे पॅकेज देऊन रक्कम खात्यात जमा केली जात आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ दिली नाही.” हा दिलेल्या शब्द आम्ही पाळला आहे.
कर्जमाफीसंदर्भात शिंदे म्हणाले, “समितीची नियुक्ती केली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल मिळेल. 30 जूनपर्यंत निर्णय होईल.”
नगरविकास विभागाने चंद्रभागा नदीसाठी 120 कोटींचा टप्पा मंजूर केल्याची माहिती देत त्यांनी सांगितले, “विभाग कोणताही असो, सरकार म्हणून ही जबाबदारी आम्ही पार पाडणार.”
रोजगार हमी योजनेसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी