
पुणे, 2 नोव्हेंबर (हिं.स.)ओला- सुका कचरा वर्गीकरण करून, ओला कचरा जागेवरच जिरवा, नागरिकांकडून सातत्याने कचरा टाकण्यात येणाऱ्या ठिकाणांचे (क्रॉनिक स्पॉट) सर्वेक्षण करून अशी ठिकाणे पुढील एक महिन्यात बंद करा आणि शहर स्वच्छतेला महत्त्व देत दर महिन्याला सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवा, अशा सूचना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत दिल्या.महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार कौर यांनी घेतला. त्यानंतर कौर यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाची शनिवारी महापालिकेत बैठक घेतली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम, सर्व परिमंडळातील मुख्य आरोग्य निरीक्षक, अभियंते, आरोग्य निरीक्षक व सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. कौर यांनी प्रक्रिया प्रकल्पांचे कामकाज, दंडात्मक कारवाई, नागरिक तक्रार निवारण यंत्रणा, रात्रपाळीतील कामकाज अशा पद्धतीने विभागाच्या कार्याचा आढावा घेत सूचना केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु