श्री. पु. भागवत स्मृतिप्रीत्यर्थ देवरूखमध्ये १५ नोव्हेंबरला चर्चासत्र
रत्नागिरी, 2 नोव्हेंबर, (हिं. स.) : ज्येष्ठ संपादक श्री. पु. भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देवरूख या त्यांच्या जन्मगावी येत्या १५ नोव्हेंबर रोजी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. देवरूखमधील डी-कॅड कॉलेजमध्ये कला साहित्य संस्कृती व्यवहार या विषयाव
प्रा श्री पु भागावत


रत्नागिरी, 2 नोव्हेंबर, (हिं. स.) : ज्येष्ठ संपादक श्री. पु. भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देवरूख या त्यांच्या जन्मगावी येत्या १५ नोव्हेंबर रोजी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

देवरूखमधील डी-कॅड कॉलेजमध्ये कला साहित्य संस्कृती व्यवहार या विषयावर हे एक दिवसीय चर्चासत्र होणार आहे. त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी साहित्याचे अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये कोल्हापूर, धुळे, जळगाव, गोवा येथील ज्येष्ठ अभ्यासक निबंधवाचन करून त्यावर चर्चा करणार आहेत.

आधुनिक मराठी वाङ्मयाच्या जडणघडणीमध्ये व त्याचे पालनपोषण करण्यामध्ये प्रा. श्री. पु. भागवत यांचे योगदान फारच मोलाचे आहे. मौज आणि सत्यकथा या नियतकालिकांचे हे सुजाण संपादक होते. मौज प्रकाशनगृहाची ख्याती अवघ्या महाराष्ट्रात सुपरिचित असून त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांना जास्तीत जास्त साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी दोन साहित्यिक प्रा. वसंत आबाजी डहाके व प्रा. प्रवीण दशरथ बांदेकर चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.

चर्चासत्र देवरूखचे सुपुत्र दिवंगत प्रा. श्री. पु. भागवत यांच्या जन्मशताब्दी पूर्ततेनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित केले आहे. त्याच्या आयोजनाची जबाबदारी येवला (जि. नाशिक), येथील अनुष्टुभ प्रतिष्ठानने घेतली आहे. स्थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष अजय पित्रे यांच्या नेतृत्वाखाली देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन (डी-कॅड) कॉलेजने चर्चासत्र पार पाडण्यासाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे श्री. पु. भागवत यांच्या पूर्वीच्याजन्म घरी या वाङ्मयीन उपक्रमाचा सुयोग जुळून आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयातील प्राध्यापकांनी व वाङ्मयप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande