सिंधुदुर्ग : सेरेना म्हसकरने पटकावले कबड्डीचे सुवर्णपदक
सिंधुदुर्ग, 2 नोव्हेंबर, (हिं. स.) : नांदगाव (ता. कणकवली) येथील सुकन्या सेरेना सचिन म्हसकर हिने नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या एशियन युथ गेम्स कबड्डी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यामध्ये तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. ना
सेरेना म्हसकर


सिंधुदुर्ग, 2 नोव्हेंबर, (हिं. स.) : नांदगाव (ता. कणकवली) येथील सुकन्या सेरेना सचिन म्हसकर हिने नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या एशियन युथ गेम्स कबड्डी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यामध्ये तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

नांदगावच्या मधलीवाडीतील रहिवासी सेरेना म्हसकर सध्या मुंबईत भांडुप येथे वास्तव्यास आहे. सेरेना दहावीत असताना आईवडिलांचा खेळाचा वारसा पुढे जपत कबड्डी खेळात तिने आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली. महाराष्ट्र किशोरी गटाची धुरा सेरेनाने समर्थपणे सांभाळली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाकडून खेळताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारतीय मुलींच्या कबड्डी संघाने बहारीन येथे झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत इराणला हरवून पहिले सुवर्णपदक जिंकून तिच्या संघाने इतिहास रचला.

सेरेनाची आई मेघाली कोरगावकर म्हसकर ही कबड्डी तर वडील सचिन म्हसकर कबड्डी आणि रग्बी खेळाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. मेघाली कोरगावकर म्हसकर यांना शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला असून सचिन म्हसकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर रग्बी खेळाचे देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. सुवर्णपदक विजेत्या सेरेनाचे मुंबई विमानतळावर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष गजानन कीर्तीकर यांनी स्वागत केले. यावेळी सेरेनाचे आईवडील आणि असंख्य चाहते उपस्थित होते. सेरेनाच्या दमदार कामगिरीबद्दल माजी खासदार मनोज कोटक यांनी सेरेनाची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी श्री. कोटक यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत सेरेना च्यायशाची माहिती देताच, फडणवीस यांनीही तिचे अभिनंदन केले. स्पर्धेकरिता महाराष्ट्रातून एकमेव सेरेनाची निवड झाली होती. महाराष्ट्राच्या मातीतील या खेळातील कौशल्याने सेरेनाने विजयश्री खेचत आणून सुवर्णपदकाची कमाई केली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर सेरेनाचे अभिनंदन केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande