
सोलापूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : अतिवृष्टीमुळे सिना नदीला आलेल्या पुरामध्ये शालेय विद्यार्थी यांचे शालेय साहित्य वाहून गेलेले होते. या विद्यार्थ्यांना परिपूर्ण शालेय साहित्य देवुन उमेद अभियानाने केलेले सामाजिक काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांनी केले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पूरग्रस्त विद्यार्थी यांना शालेय साहित्य देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन सामाजिक संस्था, उद्योजक तसेच वेगवेगळ्या कार्यालय यांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत स्वयंसहायता समूहमधील सदस्य, अभियानातील कर्मचारी यांनी स्वखुशीने निधी जमा करून करमाळा तालुक्यातील 7 गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी यांना 700 शालेय कीटचे वाटप केले. करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त असलेले बाळेवाडी व पोथरे या दोन्ही गावातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख, सुषमा बिचुकले, गणेश पाटील, आण्णा आवताडे, उमेश डांगे, तालुका व्यवस्थापक योगेश जगताप, दिगंबर साळुंखे, चंद्रकांत माने उपस्थित होते. ---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड