
सोलापूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठी एमआयडीसी म्हणून चिंचोली एमआयडीसीची ओळख आहे. १०२८ हेक्टरवरील या एमआयडीसीत सध्या ५०० हून अधिक उद्योग सुरू आहेत. चिंचोली एमआयडीसीत सध्या केवळ ३७ हेक्टरच जागा शिल्लक राहिली आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूर कार्यालयाने १५१ हेक्टर अतिरिक्त चिंचोली एमआयडीसीचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर अजून निर्णय बाकी आहे.सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर चिंचोली एमआयडीसी आहे. मोहोळ व उत्तर सोलापूर या दोन तालुक्यांत ही एमआयडीसी विस्तारली आहे. या ठिकाणी १० हजारांहून अधिक कामगार काम करतात. जिल्ह्यात सोलापूर- पुणे, सोलापूर- हैदराबाद, सोलापूर- विजयपूर, नागपूर- रत्नागिरी, सोलापूर- तुळजापूर, सोलापूर- अक्कलकोट अशी महामार्गांची कनेक्टिव्हिटी आहे. याशिवाय आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातून सुरत- चेन्नई आणि नागपूर ते गोवा (शक्तिपीठ महामार्ग) हे महामार्गही जाणार आहेत. रेल्वेचीही सोय असून, आता सोलापूर- गोवा आणि सोलापूर- मुंबई विमानसेवा देखील सुरू झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड