
सोलापूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। मुंबई विमानतळावर आठवड्यातील सातही दिवस विमान सेवा सुरू करण्यासाठी स्लॉट उपलब्ध होत नसल्याने तूर्त तरी आठवड्यातून पाच दिवस विमानसेवा सुरू राहणार आहे. रोजच्या विमान सेवेसाठी प्रवाशांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्या 15 ऑक्टोबरपासून सोलापूर-मुंबई विमान सेवेस प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी विमान उडान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विमान सेवेस प्रारंभ झाला. त्यानंतर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे 1 नोव्हेंबरपासून सोलापूर ते मुंबईसाठी रोज विमान सेवा सुरू करण्याचे नियोजन होते. त्याबाबतची घोषणा संबंधित विमान सेवा कंपनीने जाहीर केली होती. परंतु मुंबई विमानतळावर सात दिवसांचा स्लॉट मिळवण्यात अडथळा आल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रोज विमान सेवेसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. पहिल्या आठवड्यात पाच दिवस विमान सेवा सुरू राहणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यापासून आठवड्यातील सातही दिवस विमान सेवा सुरू करण्यासाठी विमान सेवा कंपनीकडून सर्व स्तरावरुन जिकरीचे प्रयत्न सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड