
रायगड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील वयाळ ते लोधीवली या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन शासकीय यंत्रणांमधील वादामुळे रस्त्याचे काम रखडले असून, ग्रामस्थांना दररोज हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मध्यस्थीने अलीकडेच झालेल्या बैठकीत तात्पुरता तोडगा काढण्यात आला होता.
या बैठकीत दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात रस्त्याची पाहणी करून तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, नोव्हेंबर महिना सुरू असूनही प्रत्यक्ष कामाला प्रारंभ न झाल्याने ग्रामस्थ पुन्हा एकदा अस्वस्थ झाले आहेत.
वयाळ–लोधीवली रस्ता गेल्या तीन-चार वर्षांपासून अत्यंत खराब स्थितीत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईन कामामुळे रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून प्रवास करणे जीवघेणे ठरत असून, शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होते. ग्रामस्थांच्या सततच्या मागणीनंतर तहसीलदार चव्हाण यांनी मध्यस्थी करत दोन्ही विभागांना जबाबदार धरले. त्यांच्या हस्तक्षेपामुळे ग्रामस्थांचे प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
या बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती खालापूर, तसेच स्थानिक ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी आणि शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. आता नोव्हेंबर महिना उजाडल्याने ग्रामस्थ प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी होण्याकडे लक्ष ठेवून आहेत. ठरलेल्या वेळेत काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांनी पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके