
लातूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.)मांजरा, तेरणा, रेणा आणि तिरु या नद्यांवरील एकुण ३५ बराजमध्ये ६९.९१६८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ८७.४ टक्के पाणीसाठ्याची शाश्वत स्त्रोताची निर्मिती होऊन ९९३ हेक्टर सिंचन क्षेत्र पुर्नस्थापीत झाले आहे. त्याचा लाभ शेतक-यांना मिळत आहे. बराजेसची शृंखला जलमय झाल्याने सिंचन क्षेत्रात सुमारे १२ हजार हेक्टरपेक्षा अधिक वाढ झाली आहे. या ३५ बराजपैकी १९ बराज काठोकाठ भरले आहेत. केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पापासून देवणी तालुक्यातील सिंधीकामठ या गावापर्यंत १३५ किलो मीटरची मांजरा नदी पाण्याने भरुन वाहत आहे. मांजरा खो-यात अनियमित व अवेळी पडणारा पाऊस यामुळे कोल्हापूरी बंधा-यांमध्ये मनुष्यबळाने वाहत्या पाण्यामध्ये दरवाजे टाकण्याचे जिकिरीचे व अडचणीचे काम होते. कोल्हापूरी बंधा-यांमध्ये अपेक्षीत पाणीसाठा करता येत नव्हता. त्यामुळे परीसरात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. ही बाब लक्षात घेता कोल्हापूरी पद्धतीच्या बंधा-यांच्याद्वारांमध्ये नवीन तांत्रिक सुधारणा करुन बॅरेजेप्रमाणे उभ्या उचल पद्धतीचे विद्युत संचलीतद्वारे बसवून बॅरेजेमध्ये रुपांतर करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यास मंजूरी मिळाली आणि महाराष्ट्रात प्रथमच मांजरा नदीवरील बिंदगीहाळ, नागझरी, वांगदरी या तीन कोल्हापूरी बंधा-यांचे बॅरेजच्या धर्तीवर रुपांतर करण्यात आले. त्यामुळे बंधा-यांमध्ये पुर्ण क्षमतेने १०० टक्के पाणीसाठ्याची शाश्वत स्त्रोताची निर्मिती होऊन ९९३ हेक्टर सिंचन क्षेत्र पुर्नस्थापीत झाले आहे. त्याचा लाभ शेतक-यांना मिळत आहे. बराजेसची शृंखला जलमय झाल्याने सिंचन क्षेत्रात सुमारे १२ हजार हेक्टरपेक्षा अधिक वाढ झाली आहे. मांजरा नदीवरील १५, तेरणा नदीवरील ७, रेणा नदीवरील ३, तेरणा नदीवरील (समन्वय कार्यालये प्रकल्प) २, रेणा नदीवरील (समन्वय कार्यालये प्रकल्प) १ आणि तिरु नदीवरील (समन्वय कार्यालये प्रकल्प) ७, असे एकुण ३५ बराजमध्ये ६९.९१६८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ८७.४ टक्के पाणीसाठा आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis