
रायगड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। कामोठे वसाहतीतील गिरीजा सोसायटीमध्ये झालेल्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी आमच्यावर करण्यात आलेले आरोप निराधार असून कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आरोपींचा लवकरच शोध लागेल, असा विश्वास दिघे कुटुंबीयांनी व्यक्त केला. त्यांनी आज (दि. २ नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.
सुमारे ४० दिवसांपूर्वी सविता म्हस्कर यांच्या घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. या संदर्भात म्हस्कर यांनी शेजारी राहणाऱ्या दिघे कुटुंबीयांवर संशय व्यक्त केला होता. मात्र, दिघे कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून लावत स्पष्ट केले की, “म्हस्कर कुटुंबीयांशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांनी अनेकदा आपल्या घराच्या चाव्या आमच्याकडे ठेवल्या होत्या. परंतु चोरीस आमचा कोणताही संबंध नाही. चोरीनंतर आम्ही त्यांच्यासोबत पोलिस ठाण्यातही गेलो.” शंतनू दिघे आणि मोनिका दिघे यांनी सांगितले की, “आम्ही पोलिसांच्या सर्व चौकशीस सहकार्य केले आहे. आमचे सीसीटीव्ही फुटेज, बँक खात्याची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे आम्ही वेळोवेळी पोलिसांना दिली आहेत.”
त्यांनी पुढे सांगितले की, “सोसायटीच्या निवडणुकीत आमचे पॅनल सत्तेत आले असून काही व्यक्तींना त्याचा राग आहे. त्यामुळेच आम्हाला जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवले जात आहे. आमच्याविरोधात सोशल मीडियावर अपप्रचार सुरू आहे आणि आमच्या नोकरीच्या ठिकाणी बदनामी केली जात आहे.”
“तरीदेखील आम्हाला पोलिसांच्या तपासावर पूर्ण विश्वास असून ते खरे गुन्हेगार पकडतील. प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर आमच्या मानहानीबाबत आम्ही कायदेशीर कारवाई करू,” असे दिघे कुटुंबीयांनी ठामपणे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके