
रत्नागिरी, 2 नोव्हेंबर, (हिं. स.) | कोकण कृषी विद्यापीठातर्फे अश्वगंधा लागवडीबाबतचे प्रशिक्षण शिबिर आणि कृषी प्रेरणासत्र येत्या 6 नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता देवरूख येथील संगमेश्वर पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात होणार आहे.
दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, संगमेश्वर तालुका कृषि अधिकारी कार्यालय, गटविकास अधिकारी, ॲग्रोस्टार शेतकरी कंपनी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार आहे. कुलगुरू डॉ. संजय भावे स्वतः उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
कोकणातील सुपीक माती, सेंद्रिय परंपरा आणि शास्त्रीय मार्गदर्शन एकत्र आले तर शेतकऱ्यांचा नफा दुप्पट होऊ शकतो. याच विषयावर औषधी शेतीतून कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
अश्वगंधा हे कोकणातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णपीक ठरू शकते. त्यासाठी खर्च कमी, पाणीही कमी लागते. तरीही जास्त नफा मिळतो. हेक्टरी उत्पन्न ६ ते ८ क्विंटल होते. अश्वगंधाचा प्रतिकिलो दर २५० ते ४५० रुपये प्रतिकिलो आहे. हेक्टरी निव्वळ नफा एक लाख ७५ हजार रुपयांपर्यंत होऊ शकतो. पिकाचा कालावधी ५ ते ६ महिने आहे. थेट कंपनीकडून खरेदीची हमी मिळते. तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत प्रतिहेक्टर ६० हजार ते एक लाख २० हजार रुपयांपर्त अनुदान मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे.
शिबिराच्या नोंदणीसाठी ओंकार बेलोसे (9823456781), निखिल कोळवणकर (9420907388),
रोहित पाटील (ॲग्रोस्टार - 7744051006), प्रणय मायनाक (कृषि विस्तार अधिकारी) (9823832863 / 9370526572) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पहिल्या 100 शेतकऱ्यांना विनामूल्य कृषि दैनंदिनी व विशेष सवलत दिली जाणार आहे.
प्रशिक्षण वर्गातच सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक माहिती दिली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी