
रत्नागिरी, 2 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यात मुबलक पाऊस पडतो, तरीही संपूर्ण ग्रामीण भाग जिल्हा परिषदेला पाणी टंचाईमुक्त करता आला नाही. लोकांच्या प्रश्नांची जाण नसणारे लोक निवडले जात असल्याने अनेक योजना येऊनही पाणी समस्या आहेत, असा आरोप गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी मुबलक पाऊस पडत असतानाही, जिल्हा परिषदेला जिल्ह्याचा संपूर्ण ग्रामीण भाग पाणीटंचाईमुक्त करण्यात इतक्या वर्षांत यश आलेले नाही. जलस्वराज्य, राष्ट्रीय पेयजल योजना आणि सध्या सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशनसारख्या योजना असूनही ही परिस्थिती कायम आहे. यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासन आणि निवडून गेलेले सदस्य पाणीपुरवठा करण्याच्या आपल्या मूळ कर्तव्यात अपयशी ठरले आहेत, असे मत श्री. खंडागळे यांनी व्यक्त केले आहे.
दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली 'जल जीवन मिशन' योजना जिल्ह्यातील अनेक भागात अजूनही अर्धवट अवस्थेत आहे. परिणामी नागरिकांना त्यांच्या हक्काचे दररोज प्रति माणशी ५५ लिटर पाणी अनेक गावांमध्ये मिळत नाही. मुबलक पाणीपुरवठा करणे हे जिल्हा परिषदेचे प्रमुख कर्तव्य असतानाही ग्रामीण भागाला पाणी देण्यास रत्नागिरी जिल्हा परिषद पूर्णपणे अपयशी ठरली आहे, अशी टीका खंडागळे यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करताना श्री. खंडागळे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले की, अपूर्ण जल जीवन मिशन योजना पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणत्याही ठोस हालचाली दिसत नाहीत. नागरिकांना वेळेत त्यांच्या मूलभूत सुविधा मिळणार नसतील, तर जिल्हा परिषदेमध्ये नागरिकांचे प्रश्न बेधडकपणे मांडणारे आणि प्रशासनाला जाब विचारणारे प्रतिनिधी निवडून जाणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारांना आवाहन केले आहे की, केवळ ठेकेदार आणि धनाढ्य लोक जिल्हा परिषदेत निवडून गेल्यास जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. पाणी प्रश्न लक्षात घेऊन तरी मतदारांनी येणाऱ्या काळात चांगले आणि तळमळीने काम करणारे उमेदवार निवडून द्यावेत. जिल्हा परिषद हे काही लोकांच्या राजकीय सोयीचे ठिकाण नसून ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवण्याचे ते प्रभावी माध्यम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ज्या गावांमध्ये जल जीवन मिशन योजना अर्धवट आहेत किंवा ज्यांना पाणीटंचाईच्या समस्या भेडसावत आहेत, अशा नागरिकांनी गाव विकास समिती'कडे आपल्या समस्या मांडाव्यात. गाव विकास समिती या प्रश्नांचा प्रशासनाकडे पाठपुरावा करेल, असे आश्वासन श्री. खंडागळे यांनी दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी