
जळगाव, 6 डिसेंबर, (हिं.स.) - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘बौद्धिक संपदा हक्क’ विभागामार्फत दिल्ली येथील अनोव्ह आयपी प्रायव्हेट लिमिटेड या बौद्धिक संपदा नोंदणीकरणात अग्रगण्य असलेल्या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये विद्यापीठातील बौद्धिक संपदा नोंदणी साठी मोठी मदत होणार आहे. तसेच विद्यापीठाच्या मंजूर झालेल्या पेटंटचे व्यवसायिकीकरण करण्यासही सदर कंपनी सहकार्य करणार आहे. कुलगुरू कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
याप्रसंगी कंपनीतर्फे प्रवीण नंदन (सहयोगी संचालक), अभिषेक कुमार (सहायक संचालक), विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र. कुलगुरू प्रा. एस . टी. इंगळे, बौद्धिक संपदा हक्क विभागातील पीठासीन प्राध्यापक डॉ. डी. जी. हुंडीवाले, समन्वयक प्रा. विकास गिते आणि संशोधन अधिकारी डॉ. सारंग बारी उपस्थित होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘बौद्धिक संपदा हक्क’ विभागामार्फत ‘आंतरमहाविद्यालयीन बौद्धिक संपदा आणि नवसंशोधन धोरण स्पर्धा’ घेण्यात आली. स्पर्धेचे उद्धाटन विद्यापीठातील जैवशास्त्र प्रशालेचे संचालक प्रा. भूषण चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध विधी महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले. त्यापैकी अंतिम फेरीत पोचलेल्या डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचा संघ विजयी झाला तर एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाचा संघ उपविजयी घोषित करण्यात आला. विजेत्यांना दिल्ली येथील अनोव्ह आयपी प्रायव्हेट लिमिटेड या बौद्धिक संपदा नोंदणीकरणात अग्रगण्य असलेल्या कंपनीचे सहयोगी संचालक श्री. प्रवीण नंदन आणि बौद्धिक संपदा हक्क विभागातील पीठासीन प्राध्यापक डॉ. डी. जी. हुंडीवाले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी विभागाचे समन्वयक प्रा. विकास गिते, संशोधन अधिकारी डॉ. सारंग बारी आणि मयूर पाटील उपस्थित होते. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या ‘राष्टीय बौद्धिक संपदा आणि नवसंशोधन धोरण’ स्पर्धेत सदर संघ विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर