
रत्नागिरी, 6 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱ्या येथील महत्त्वाकांक्षी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचे ठरलेले टप्पे वेळेत पूर्ण न केल्याने पत्तन विभागाने संबंधित ठेकेदाराला १ कोटी ८८ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ठेकेदाराने उशिरा काम सुरू केले आणि प्रत्येक टप्प्यात वेळकाढूपणा केल्यामुळे पत्तन विभागाने हा दणका दिला आहे. सध्या काम संथ गतीने सुरू असल्यामुळे कामाची गती वाढवण्यासाठी ठेकेदाराला पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे.
१६२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या पावसाळ्यापूर्वी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मिऱ्या येथील बहुप्रतीक्षित धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एकूण १२०० मीटरच्या कामापैकी ९०० मीटरचे काम सध्या सुरू आहे. समुद्रातील खालचा दगडांचा थर टाकून झाला आहे, असे सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी