
धुळे, 6 डिसेंबर, (हिं.स.) दोंडाईचा शहरातील भगवती इंजिनिअरिंग वर्क शॉप येथे झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि दोंडाईचा पोलिसांनी उलगडा केला आहे. पोलिसांनी दोघा विधीसंघर्षित बालकांसह चार संशयीतांना ताब्यात घेऊन एकूण ४८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात, दि.२५ ते २६ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोंडाईचा शहरातील भगवती इंजिनिअरिंग वर्क शॉप दुकानाचे शटर उचकवून आत प्रवेश करीत विविध साहित्य चोरी केले होते. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
परिस्थितीजन्य पुरावे आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काल (दि.५) दोंडाईचा शहरातून सनी दिलीप चौधरी (१८) रा.आदर्श नगर, झोपडपट्टी, साईबाबा मंदिराजवळ, दोंडाईचा, प्रकाश नामदेव भोई (१८) रा. महादेवपूर, दोंडाईचा व दोन विधीसंघर्षित बालक अशा चार संशयीतांना ताब्यात घेवून पथकाने त्यांची कसून सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व चोरी केलेला मुद्देमाल १५ हजार रुपये किंमतीच्या ४ ईलेक्ट्रीक मोटारी (शेतकर्यांच्या दुरुस्तीसाठी आलेल्या), ५ हजार रुपये किंमतीचा गॅस कटर, प्रत्येकी ७ हजार रुपये किंमतीच्या पाण्याच्या ४ ईलेक्ट्रीक मोटरी, असा एकूण ४८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल काढून दिला. पथकाने हा मुद्देमाल जप्त केला आहे. दोंडाईचा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्तरित्या केलेल्या या कारवाईमुळे हा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर