
डोंबिवली, 6 डिसेंबर (हिं.स.)। स्थानिक आमदार रवींद चव्हाण तथा प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवाराच्या संकल्पनेतून मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग स्पर्धेचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी चव्हाण यांनी तुफान फलंदाजी करीत चौकार षटकार मारले. सिनेकलाकार तथा गोलंदाजाला विकेट घेण्याचा चान्स दिला नाही.
डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर मराठी मनोरंजन विश्वातील तब्बल ८० हून अधिक लोकप्रिय कलावंत एकाच मैदानावर दोन दिवस हा रोमांचक क्रिकेटच्या स्पर्धेत दिसणार आहेत. निमित्त म्हणजे मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग अंतर्गत आयोजित करण्यात आलेले सामने डोंबिवलीकर संस्थेने आयोजित केले आहेत. आमदार रवींद चव्हाण (प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश) यांच्या डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवाराच्या संकल्पनेतून होत आहेत. या चषकाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी घडवणाऱ्या आठ दिग्गज महानुभावांना आदरांजली म्हणून त्यांच्या नावाने संघ बनवण्यात आले आहेत. पहिला संघ निळू फुले नावाने असून त्याचा संघनायक सिद्धार्थ जाधव आहे.
शनिवार व रविवार दोन दिवस डोंबिवलीत फक्त क्रिकेट, उत्साह, कलाकारांची धमाल आणि मनोरंजनाचा झंझावात पाहायला मिळणार आहे. मैदानावर कलाकारांची फिल्डिंग, बॅटिंग, चौकार-षटकारांचा वर्षाव आणि एकमेकांमधील मैत्रीपूर्ण टक्कर हे सर्व प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव देणार आहे. प्रत्येक संघ आपल्या नावाशी जोडलेल्या महान दिग्गजांना सन्मान देत मैदानावर उतरणार असल्याने स्पर्धेला भावनिक आणि सांस्कृतिक रंगही मिळणार आहे. डोंबिवलीकर चषकासाठी होणारी लढत प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय अशीच ठरणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi