
नाशिक, 6 डिसेंबर (हिं.स.)।
- विद्यापीठाच्या नावाने खोट्या व बनावट पावत्या तयार करुन तसेच विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेले सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या बँक खात्यात जमा करुन आरोपी विज्ञान विद्यापीठाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डॉ. संदीप सिताराम कडू (रा. स्टाफ क्वॉर्टर, दिंडोरी रोड, म्हसरुळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आरोपी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे बडतर्फ कक्ष अधिकारी विजय मधुकर जोंधळे, वरिष्ठ लिपिक सुरेंद्र मारुती रोकडे व शिपाई अर्चना प्रकाश निकम यांनी त्यांच्या नोकरीच्या कालावधीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या परिक्षा विभागात कार्यरत होते. त्यांनी या कालावधीत विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी आवश्यक ट्रान्सक्रिप्ट, डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन तसेच विद्यापीठ प्रमाणपत्रांवरील नेम करेक्शन, डॉक्यूमेंट अॅटे चस्टेशन आदी कामांपोटी विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या शुल्काची रक्कम विद्यापीठाच्या बँक खात्यात जमा
करणे आवश्यक होते. मात्र तिघा आरोपींनी तसे न करता स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करून सुमारे १ कोटी ५३ लाख १० हजार २०५ रुपयांचा अपहार, गैरव्यवहार केला आहे. या तिघा कर्मचा-यांनी अपहार करताना विद्यापीठाच्या खोट्या बनावट पावत्या तयार केल्या आहेत.
यावरून आरोपींनी संगनमत करुन विद्यार्थ्यांकडून प्राप्त शुल्काची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या बँक खात्यात जमा करून विद्यापीठासह विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२३ पूर्वी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात घडला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तिघा कर्मचाऱ्यांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावित करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV