
जळगाव , 6 डिसेंबर (हिं.स.) महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीवर हरकतींचा पाऊस पडला असून अखेरच्या दिवसापर्यंत १८,७५५ हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकती निकाली काढण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. आतापर्यंत केवळ ९,००० हरकती निकाली काढण्यात आल्या असून, निर्धारित वेळेत हे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेता, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी हरकतींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी १०२ जणांची विशेष टीम नियुक्त केली आहे.
निवडणुकीशी संबंधित कामकाजासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून याआधी ५२ जणांची टीम काम करीत होती. त्यातील एक टीम फिल्डवर तर दुसरी टीम कार्यालयात हरकतींचा निपटारा करीत होती. आता शुक्रवारी पुन्हा १०२ जणांनी नियुक्त करण्यात आली. १९ प्रभागांमध्ये ही टीम कार्यरत असेल. प्रत्येक पथकात एक पथक प्रमुख असून, त्यांच्यासोबत गरजेनुसार कुठे तीन तर कुठे चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कामावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, नगररचनाचे सहायक संचालक राजेश महाले व मुख्य लेखा परिक्षक विजयकुमार सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इसद्यस्थितीत हरकती निकाली काढण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १५४ आहे. मात्र, हरकतींची मोठी संख्या पाहता, ८ डिसेंबरपर्यंत सर्व हरकती निकाली काढणे प्रशासनासाठी अवघड दिसत आहे. त्यामुळे या कामासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर