
जळगाव, 6 डिसेंबर (हिं.स.) | पारोळा शहरातील धोबी गल्ली परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत अवघ्या ३ वर्षांच्या बालिकेचा लोखंडी जिन्यावरून पडून मृत्यू झाला.
या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृत बालिकेचे नाव कोमल दत्तात्रय वाघ असे आहे. कोमल ही घराच्या लोखंडी जिन्यावरून खाली उतरत असताना अचानक तोल जाऊन ती थेट खाली पडली. पडतानाच तिच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. कुटुंबीयांनी कोमलला तात्काळ कुटीर रुग्णालयात दाखल केले; मात्र तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या अचानक झालेल्या दुर्दैवी घटनेने वाघ कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर