रत्नागिरी : महात्मा फुले वाडा भाडे तत्त्वावर देण्याच्या मागणीचा जिजाऊ ब्रिगेडकडून निषेध
रत्नागिरी, 6 डिसेंबर, (हिं. स.) : पुणे येथील महात्मा फुले वाडा भाडेतत्त्वावर समता परिषदेला देण्याची मंत्री छगन भुजबळ यांनी केलेली मागणी फेटाळावी, या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा जिजाऊ ब्रिगेडतर्फे चिपळूणचे तहसीलदार श्री. लोकरे यांच्यामार्फत राज्याचे
जिजाऊ ब्रिगेडचे निवेदन


रत्नागिरी, 6 डिसेंबर, (हिं. स.) : पुणे येथील महात्मा फुले वाडा भाडेतत्त्वावर समता परिषदेला देण्याची मंत्री छगन भुजबळ यांनी केलेली मागणी फेटाळावी, या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा जिजाऊ ब्रिगेडतर्फे चिपळूणचे तहसीलदार श्री. लोकरे यांच्यामार्फत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले वाडा हा देशाचा ऐतिहासिक वारसा असून कोणत्याही जाती, व्यक्ती किंवा संघटनेची मालमत्ता नाही. शासन आणि पुरातत्त्व विभाग या ऐतिहासिक वास्तूचे संगोपन करण्यास सक्षम असल्याने वाडा कोणत्याही खासगी संघटनेला भाडेतत्त्वावर देऊ नये, अशी जिजाऊ ब्रिगेडची स्पष्ट भूमिका आहे.

सध्या सर्वसामान्य नागरिक, महिला व सामाजिक संघटना या वाड्यात मुक्तपणे जाऊन महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतात. हे ठिकाण महिलांसाठी ‘हक्काचे स्थान’ असल्याने याठिकाणी कोणत्याही प्रकारचे बंधन किंवा नियंत्रण आणणे अयोग्य असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

शासनाने ही मागणी मान्य केल्यास जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

निवेदन देताना जिल्हा अध्यक्षा स्नेहल चव्हाण, जिल्हा सचिव पूर्वा तांदळे, जिल्हा खजिनदार शिवानी भोसले, तसेच खेड तालुका अध्यक्षा रोहिणी मोरे उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande