
नाशिक, 6 डिसेंबर (हिं.स.)।
- तपोवनात होऊ घातलेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सकाळी तपोवन आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तपोवनातील जुनी १८३४ वृक्ष तोडणार असून नाशिक महानगरपालिकेच्या या कारवाईविरोधात राज्यात विरोध होत असून शहरात विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष, पर्यावरण, प्रेमी, वृक्षप्रेमी आंदोलनात उतरले आहेत. सुमारे महिनाभरापासून हे आंदोलन चालू असून तपोवनातील एकही वृक्ष तोडला जाणार नाही यासाठी आक्रोश मोर्चा, जनआंदोलन, सह्यांची मोहीम, संगीत, कविता आदी वेगवेगळ्या मार्गाने नाशिककर लक्ष वेधून घेत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन करण्यात आले. नाशिककरांना ऑक्सिजन पुरविणाऱ्या व त्यापेक्षाही जास्त कार्बनडाय-ऑक्साइड घातक वायू शोषून घेणाऱ्या असंख्य जुन्या वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. या घटनेचा निषेध करीत यावेळी घोषणा देऊन वृक्षतोडीला विरोध दर्शविला. यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, सलिम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, सुजाता डेरे, सत्यम खंडाळे, अॅड. रतनकुमार इचम यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV