
रत्नागिरी, 6 डिसेंबर, (हिं. स.) | महाराष्ट्र संविधान जागर विचारमंचातर्फे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त राष्ट्रीय संविधान परिषद रत्नागिरीत रविवारी, दि. ७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
'आम्ही, भारताचे लोक...' या शब्दांपासून सुरुवात होणारी संविधानाची प्रस्तावना ही संविधानाचे सार आहे. भारतीय संविधानाचा अमृतमहोत्सव हा भारताच्या लोकशाही आत्म्याचा आणि राष्ट्र म्हणून असलेल्या आपल्या सामूहिक इच्छा-आकांक्षा, प्रत्येक भारतीय नागरिकाचा, विविधतेने नटलेल्या संस्कृती व स्वातंत्र्याचा उत्सव आहे. स्वातंत्र्यलढ्यातील अनुभव, त्यातील विविध वैचारिक प्रवाह, आदर्शापासून प्रेरणा घेऊन अथक परिश्रम करून निर्माण केलेल्या संविधानाचा अमृतमहोत्सवापर्यंतचा हा प्रवास त्याच्या चिरंतन शाश्वततेचा आणि सक्षम ताकदीचा पुरावा आहे.
संविधानाच्या अमृतमहोत्सवपूर्तीच्या पवित्र व मंगलसमयी संविधानिक आणि लोकशाही मूल्यांच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत असलेल्या संविधान जागर विचारमंचाने रत्नागिरीत राष्ट्रीय संविधान परिषद आयोजित केली आहे.
परिषदेच्या मुख्य कार्यक्रमापूर्वी सकाळी ८.३० वाजता संविधान दिंडी निघेल. ती जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होऊन स्वा. सावरकर नाट्यगृहापर्तंय निघेल. सकाळी साडेदहा वाजता परिषदेचे उद्घाटन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व संविधान अभ्यासक, माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते होईल.
परिषदेचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती न्या. अभय ठिपसे भूषविणार आहेत. त्यानंतर मी भारतीय नागरिक आणि संविधान, भारतीय संविधानातील उद्धृत सामाजिक न्याय, भारतीय संविधान आणि महिला सबलीकरण, संविधान : काल, आज आणि उद्या, समाजातील तळागाळापर्यंत खरोखरच संविधान पोहोचले आहे का? या विषयांवरील सत्रे पार पडतील. त्यामध्ये प्रा. सुचिता गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, दंगलकार मा. नितीन चंदनशिवे (प्रसिद्ध कवी व सामाजिक कार्यकर्ते) आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आणि आदर्शावर आधारित शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे सामाजिक नाटक सादर करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी