
लातूर, 6 डिसेंबर (हिं.स.)। शिक्षण आणि धार्मिक स्थळांपासून दारू दुकाने किमान १०० मीटर दूर असावी लागतात. याच नियमाचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु.) येथील ग्रामपंचायतीने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद शाळेजवळ (समर्थ नगर, रेल्वे स्टेशन) बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या परवानाधारक देशी दारू दुकानाच्या (परवाना क्रमांक २२५) स्थलांतराचा ठराव ग्रामसभेने एकमताने मंजूर केला आहे.
काय आहे प्रकरण?
हरंगुळ (बु.) येथील समर्थ नगर (रेल्वे स्टेशन) परिसरात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर हे देशी दारू दुकान क्र. २२५ सुरू आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ आणि दि. ०४/०२/१९७६ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार ग्रामपंचायत हद्दीतील शैक्षणिक किंवा धार्मिक संस्थांपासून दारूचे दुकान किमान १०० मीटर अंतरावर असणे बंधनकारक आहे. हा नियम मोडला जात असल्याने विद्यार्थ्यांना (विशेषतः शालेय विद्यार्थिनींना) तळीरामांचा प्रचंड त्रास होत असल्याचा सूर ग्रामसभेत उमटला.
ग्रामसभेचा ठराव: दिनांक १८/०८/२०२५ रोजी सरपंच शितल धोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत, गुणवंत उत्तमगे यांनी दारू दुकान स्थलांतराचा ठराव मांडला, ज्याला रमाकांत खरोसे यांनी अनुमोदन दिले. एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.
यानंतर, ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या ठरावाची अंमलबजावणी करण्याची आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुख्याध्यापकांच्या अहवालाचाही आधार या कारवाईसाठी घेण्यात आला आहे.
जनतेची मागणी: ग्रामस्थांनी लोकहितासाठी घेतलेल्या या निर्णायक भूमिकेमुळे प्रशासन आता या बेकायदेशीर दुकानाच्या स्थलांतरासाठी काय पाऊले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शाळा परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी या दुकानाचे तात्काळ स्थलांतर व्हावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis