पेन फ्री महाराष्ट्राने सर्वाधिक सांध्यांची तपासणी करत पटकावला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचा सन्मान
मुंबई, 6 डिसेंबर (हिं.स.)। ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाऊंडेशनच्या पेन-फ्री महाराष्ट्र उपक्रमाने 24 तासांत सर्वाधिक गुडघे तपासणी करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचा सन्मान पटकावला आहे. अजिंठा फार्माचे उपाध्यक्ष, सह-संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ता तसेच युगा
Pain-Free Maharashtra wins Guinness World Records


मुंबई, 6 डिसेंबर (हिं.स.)। ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाऊंडेशनच्या पेन-फ्री महाराष्ट्र उपक्रमाने 24 तासांत सर्वाधिक गुडघे तपासणी करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचा सन्मान पटकावला आहे. अजिंठा फार्माचे उपाध्यक्ष, सह-संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ता तसेच युगांडा प्रजासत्ताकाचे माननीय वाणिज्यदूत मधुसूदन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. जपानहून आलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या परीक्षक सुश्री सोनिया उशिरोगोची यांनी मुंबईत हा विक्रम अधिकृतपणे जाहीर केला.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे 27–28 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित या विशेष वैद्यकीय मोहिमेत महाराष्ट्रातील वंचित घटकांतील 512 रुग्णांची सलग 24 तास तपासणी करण्यात आली. वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि आसपासच्या जिल्ह्यांमधील रुग्णांनी मोठ्या संख्येने या मोफत तपासणी शिबिरात सहभाग नोंदवला. हालचालींचे मूल्यांकन, गुडघा-मांडी आरोग्य तपासणी, आवश्यक औषधांचे मोफत वाटप तसेच पुढील उपचारांचे नियोजन या सर्व सेवा शिबिरात पुरवण्यात आल्या. विशेष म्हणजे, ज्यांना गुडघा किंवा मांडी बदलण्याच्या शस्त्रक्रियेची गरज आहे, अशा प्रत्येक रुग्णाचा संपूर्ण खर्च फाऊंडेशन उचलणार आहे.

या महत्त्वपूर्ण यशाबद्दल मधुसूदन अग्रवाल यांनी सांगितले की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स हा सन्मान प्रेरणादायी असला, तरी खरे समाधान म्हणजे ज्या लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचवणे. स्वतःच्या 70व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्यसेवा उन्नतीसाठी तब्बल 70 कोटी रुपयांची घोषणा केली. या निधीतून वंचितांना सांध्यांच्या आजारांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, हालचाल सुधारणा आणि वेळेवर निदानाची सोय मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या सुश्री सोनिया उशिरोगोची यांनी या कामगिरीचे कौतुक करत म्हटले की सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाऊंडेशन व संजीवनी ममता हॉस्पिटल करत असलेला प्रयत्न जागतिक स्तरावर अनुकरणीय आहे. समाजाकरिता आरोग्यसेवा सहज आणि परवडणारी करण्याच्या या उपक्रमाला मान्यता देणे हा त्यांच्यासाठीही गौरवाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.

फाऊंडेशनने आतापर्यंत महाराष्ट्रात 214 मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करून 39,000 पेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोच साधली आहे. सांधे बदल शस्त्रक्रियांसाठी अनुदान, कर्करोग उपचार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव, डायलिसिस मदत, तसेच बालरुग्णांसाठी विशेष ऑर्थोपेडिक सहाय्य असे विविध उपक्रम फाऊंडेशन सातत्याने राबवत आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी आरोग्यसेवा सुलभ करण्याची त्यांची दीर्घकालीन वचनबद्धता या सेवांतून अधोरेखित होते.

मधुसूदन अग्रवाल यांनी 1973 मध्ये फक्त 10 हजार रुपयांच्या भांडवलावर अजंता फार्माची स्थापना केली आणि कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. आज यूएस एफडीए-अनुमोदित प्लांट्स आणि 8,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांसह अजंता फार्मा 30 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे. व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी ग्रामीण आरोग्य सुधारणा, मोफत शिबिरे, अनुदानित शस्त्रक्रिया, बालरोग हृदय शस्त्रक्रिया, मोबाइल आरोग्यसेवा आणि संजीवनी ममता हॉस्पिटलसारखे उपक्रम उभारले. त्यांच्या या कार्याला युगांडाचा डायमंड ज्युबिली मेडलसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत.

“आपण जे कमावतो ते समाजाला परत दिले पाहिजे” या विचाराने प्रेरित होऊन ते आजही निरंतर सामाजिक कार्यात आघाडीवर आहेत. पेन-फ्री महाराष्ट्र उपक्रमाची गिनीजमध्ये झालेली नोंद हे फक्त एक विक्रम नसून, ग्रामीण महाराष्ट्रात आरोग्यसेवा सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या ध्येयाचा नवा टप्पा ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande