
भुवनेश्वर, 6 डिसेंबर (हिं.स.)। भारताच्या ऐतिहासिक स्वच्छ ऊर्जा विस्तारावर प्रकाश टाकताना, चालू आर्थिक वर्षात भारताने जीवाश्मेतर उर्जा क्षमतेत 31.25 गीगावॅट इतकी विक्रमी भर घातली असून, त्यापैकी सौर उर्जेचा वाटा 24.28 गीगावॅट इतका असल्याची माहिती, केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
ओडिशात पुरी येथे आयोजित जागतिक ऊर्जा नेतृत्व शिखर परिषद 2025 ला त्यांनी संबोधित केले. यावेळी जोशी यांनी ओडिशा करता 1.5 लाख इतक्या घरांवरील सौर उर्जा यूएलए मॉडेलची घोषणा केली. ओदिशातील सुमारे 7 ते 8 लाख लोकांना याचा फायदा होईल, आणि त्यामुळे त्यांच्या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेलाही मदत होईल, असे जोशी यांनी सांगितले.
2022 मध्ये पहिल्यांदा एक टेरावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता गाठली गेली होती. यासाठी जवळपास 70 वर्षांचा कालावधी लागला. मात्र त्यानंतर अवघ्या दोन वर्षांच्या कालांतराने 2024 पर्यंत जगाने आणखी एक टेरावॅट क्षमतेची भर टाकून, दोन टेरावॅटचा टप्पा गाठला असे त्यांनी सांगितले. नवीकरणीय ऊर्जेच्या बाबतीत जागतिक पातळीवर अत्यंत वेगाने घडून आलेल्या या वाढीमागे, भारत एक प्रमुख कारक घटक असल्याचेही त्यांनी नमूद केले. गेल्या 11 वर्षांमध्ये, भारताच्या सौर क्षमतेत वाढ झाली असून ती, 2.8 गीगावॅटवरून सुमारे 130 गीगावॅट पर्यंत पोहोचली आहे. या वाढीचे प्रमाण 4,500% पेक्षा जास्त आहे, ही बाब त्यांनी नमूद केली. केवळ 2022 ते 2024 या दोन वर्षांच्या कालावधीत भारताने जागतिक सौर क्षमतेत 46 गीगावॅट इतके योगदान दिले असून, सर्वाधिक योगदान देणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर असल्याचेही त्यांनी अधोरेखीत केले.
भारत हा जगात कोळशाचा सर्वाधिक साठा असलेल्या देशांमध्येही पाचव्या स्थानावर असून, भारत जगातील दुसरा सर्वात मोठा कोळशाचा ग्राहक असल्याचेही त्यांनी सांगितले. एकीकडे देशात प्रचंड साठा उपलब्ध आहे, आणि दुसरीकडे नवीकरणीय उर्जेच्या दिशेने होत असलेल्या संक्रमणानेही गती पकडली आहे. अशावेळी भारत कोळसा आणि नवीकरणीय उर्जेत संतुलन राखण्याचेच काम करत असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले. आज जागतिक व्यवस्था औद्योगिक स्पर्धात्मकतेची परिसंस्था घडवत असताना, भारताचे नवीकरणीय उर्जेच्या दिशेने होत असलेले संक्रमण अधिक गरजेचे आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्वाचे ठरू लागले असल्याचे जोशी यांनी सांगितले.
जागतिक ऊर्जा नेतृत्व शिखर परिषदेविषयी
ही परिषद ओदिशात पुरी इथे आयोजित करण्यात आली आहे. जागतिक ऊर्जा नेतृत्व शिखर परिषद ही, धोरणकर्ते, नवोन्मेषकर्ते आणि या क्षेत्रातील उद्योजक - व्यावसायिकांना एकाच मंचावर आणत, देशाच्या स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने सुरु असलेल्या संक्रमणाला गती देऊ शकेल अशी सक्षम कार्यप्रणाली स्थापित करण्याच्या दिशेने महत्वाचे पहिले पाऊल ठरते आहे. दि. 5 ते 7 डिसेंबर 2025 असे तीन दिवस ही परिषद चालणार आहे. या परिषदेत ऊर्जा क्षेत्राची भविष्यातील वाटाचालीची दिशा निश्चित करण्यावर भर दिला जाईल. केंद्रीय तसेच राज्यांचे ऊर्जा मंत्री यांच्यासह ऊर्जा क्षेत्राशी संबंधित जागतिक पातळीवर आघाडीची व्यक्तिमत्वे, नवोन्मेषकर्ते आणि या क्षेत्राची संबंधित आघाडीचे उद्योजक - व्यावसायिक या परिषदेत सहभागी झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule