
पुणे, 6 डिसेंबर (हिं.स.)। युवा उद्योजक पुनीत बालन यांनी ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची पुण्यात घोषणा केली असून उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे. ही अकॅडमी म्हणजे बीसीसीआय स्तरावरील देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट सेटअप ठरणार आहे. जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची ही व्यवस्था तरुण खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेटकडे नेणारा भक्कम मार्ग ठरेल, असा विश्वास अकॅडमीचे मालक पुनीत बालन यांनी व्यक्त केला.
‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडून नेहमीच विविध खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. भारतीयांमध्ये क्रिकेट खेळांमधील प्रेम लक्षात घेऊन आता क्रिकेटच्या क्षेत्रात नवीन प्रतिभावान खेळाडू घडविण्यासाठी त्यांनी ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा केली आहे. याबाबत माहिती देताना पुनीत बालन म्हणाले, ‘‘या अकॅडमीसाठी दोन प्रमुख मैदानांची निवड करण्यात आली आहे. सिंहगड कॉलेजच्या वडगाव आणि लोणावळा येथील क्रिकेट मैदानांचा त्यात समावेश आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु