
सोलापूर, 6 डिसेंबर (हिं.स.)।
सोलापूर शहरातील भय्या चौक (लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक) ते मरिआई चौक या रोडवरील रेल्वेचा जीर्ण झालेला पूल १४ डिसेंबरला पाडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री १२ पासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. ९ डिसेंबर २०२५ ते ८ डिसेंबर २०२६ पर्यंत या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली जाईल, असा आदेश पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी काढला आहे.
सोलापूर शहरातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून मरिआई चौकाकडे जाताना १९२२ मध्ये बांधलेला रेल्वेचा जुना पूल आहे. त्यावेळी मंगळवेढा ते पंढरपूर आणि कोल्हापूरसह अन्य शहरांना जोडण्यासाठी पूल बांधला होता. १०३ वर्षे जुना पूल सध्या वाहतुकीसाठी धोकादायक, असुरक्षित झाला आहे. त्यामुळे १४ डिसेंबर रोजी तो पाडण्यात येणार आहे. त्यासाठी आधुनिक हायड्रॉलिक ब्रेकर, काँक्रिट क्रशर आणि कटिंग मशिन वापरून हा पूल तोडला जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील पूर्ण वाहतूक दुसरीकडून वळविली आहे. सुरवातीला काही दिवस पर्यायी मार्गावर सोलापूर शहर पोलिसांचे अंमलदार वाहतूक नियमन करणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड