
रत्नागिरी, 6 डिसेंबर, (हिं. स.) : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन या विषयावरील स्पर्धा घेण्यात आली. यात शिवम कीर याने प्रथम क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांना पॉवरपॉइंटचे स्किल्स, स्टेजवरील वावरासाठी आत्मविश्वास मिळणे, संभाषण कौशल्ये येणे या हेतूने ही स्पर्धा दरवर्षी भरवली जाते. उद्घाटनावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रण प्रमुख डॉ. विवेक भिडे, गणित विभागप्रमुख डॉ. दिवाकर करवंजे, परीक्षक प्रा. प्रीती भिडे व विदुला भोसले उपस्थित होते. सध्याच्या डिजिटल शिक्षणपद्धतीत पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी संपूर्ण तयारीने मांडत असलेल्या विषयाचा सखोल अभ्यास करून अशा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे मत डॉ. भिडे यांनी व्यक्त केले.
स्पर्धेत निशात पावसकर व बुशरा सुवर्णदुर्गकर यांना द्वितीय क्रमांक विभागून आणि श्रेया पातकर हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. स्पर्धेमध्ये १८ संघ मिळून ३३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
परीक्षक विदुला भोसले यांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रेझेंटेशन तयार करताना कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत. तसेच विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने सर्वांसमोर सादरीकरण करण्याबाबत मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी