
सोलापूर, 6 डिसेंबर (हिं.स.)। मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक संपताच विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींना आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. अनेक इच्छुकांनी आपल्या प्रचाराच्या अनेक फेऱ्या पूर्ण केल्या असून, जिल्हा परिषद मतदार संघातील विविध गावातील नातेवाईकाकडे हेलपाटे वाढले आहेत. दरम्यान जिल्हा परिषद मतदार संघात आपल्या समाजाचे किती मतदार आहेत याची चाचपणी सुरू झाली आहे.
मोहोळ तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गण आहेत. काही जरी झाले किंवा नेते मंडळीनी जरी नाही उमेदवारी दिली तरी लढाईचेच या निर्धाराने अनेक इच्छुक गेल्या दोन वर्षा पासून कामाला लागले आहेत. विवाह सोहळे, साखरपुडे, बारसे अशा सारख्या कार्यक्रमांना नेते मंडळी आवर्जून हजेरी लावत आहेत. ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मर जळणे, पिण्याचे पाणी, रस्ते या सारख्या समस्या आपले अधिकाऱ्या जवळ वजन वापरून नेते मंडळी करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड