
सोलापूर, 6 डिसेंबर (हिं.स.)। महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर आणि महात्मा फुले समाज सेवा मंडळ, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज, सोलापूर जिल्ह्यात एकाच वेळी 1500 अंगणवाडी सेविकांकडून बालविवाह प्रतिबंधाची शपथ दिली गेली. गावागावांतील नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला.
या उपक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. महात्मा फुले समाज सेवा मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद सोलापूरचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मिरकले यांना निवेदन देण्यात आले होते. 100 दिवसीय मोहिमेअंतर्गत बालविवाह निर्मूलनाचा संदेश व्यापक पातळीवर पोहोचविण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात आला.सध्या सोलापूर जिल्हा राज्यात बालविवाह प्रकरणांमध्ये चौथ्या क्रमांकावर असल्याने हा सामाजिक प्रश्न समूळ नष्ट करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांनी या मोहिमेचे नियोजनबद्ध मार्गदर्शन करून कार्यक्रमाला गती दिली.या उपक्रमाच्या समन्वयासाठी संस्थेच्या वतीने रजनीगंधा गायकवाड (जिल्हा समन्वयक) आणि सुजाता कांबळे (तालुका समन्वयक) यांनी संबंधित विभागांच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेत कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड