
मुंबई, 6 डिसेंबर (हिं.स.) - दादर पश्चिम येथील ब्राह्मण सेवा मंडळाच्या माध्यमातून इंदूरच्या माजी खासदार, २०१४ ते २०१९ या कालावधीत लोकसभेचे अध्यक्षपद अत्यंत कुशलतेने व यशस्वीपणे सांभाळणाऱ्या व त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविलेल्या श्रीमती. सुमित्राताई महाजन यांना २०२५ च्या 'ब्रह्मभूषण' या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्यास माजी खासदार व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनयजी सहस्त्रबुद्धे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बुधवार दि. १० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता भवानी शंकर रोड, दादर, मुंबई पश्चिम येथील ब्राह्मण सेवा मंडळाच्या तळमजल्यावरील सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार जाहीर केले आहे.
ब्राह्मण सेवा मंडळ या संस्थेने २०१६ या शतकमहोत्सवी वर्षापासून समाज जीवनाशी निगडित विविध क्षेत्रांपैकी दरवर्षी एक क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्ञातीतील मान्यवर व्यक्तींपैकी एकाचा 'ब्रह्मभूषण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यास सुरुवात केली. २०१६ साली 'ब्राह्मण सेवा मंडळा'ने प्रथम 'ब्रह्मभूषण पुरस्कार' इतिहासकार आणि महाराष्ट्र भूषण मा. कै. श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना प्रदान केला. त्यानंतर २०१७ सालचा हा पुरस्कार भारतीय सेनेत कार्यरत असलेले लेफ्ट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर यांना प्रदान केला गेला होता.
२०१८ साली जेष्ठ वैद्यकीय आणि न्युक्लिअर मेडीसीन व न्युक्लिअर कार्डीओलॉजीचे भारतातील प्रणेते कै. डॉ. रामचंद्र दत्तात्रय लेले यांना प्रदान केला. तर २०१९ साली खगोल भौतिकशास्त्रज्ञ कै. डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांना प्रदान करण्यात आला. सबळ समाज रचनेसाठी सामाजिक जाणिवांचे भान असलेल्या संस्थांचे महत्वाचे योगदान असते. दादर पश्चिम येथील भवानी शंकर रोडवरील प्रतिष्ठित ब्राह्मण सेवा मंडळ, ही मुंबईतील दादरस्थित १०९ वर्षे जुनी संस्था सुरवातीपासूनच ज्ञाती आणि समग्र समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विविध उपक्रमांच्या माध्यमातून मंडळ कार्यरत आहे.
ब्राह्मण सेवा मंडळ समाजोपयोगी उपक्रमांची प्रभावी रीतीने अंमलबजावणी करत असून, नेरूळ (नवी मुंबई) येथील जेष्ठ नागरिकांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज आनंदाश्रम वृद्धाश्रमात सुमारे १०० जेष्ठ नागरिकांची व्यवस्था असून सध्या ६० नागरिक आनंदाने वास्तव्यास आहेत. दादरमधील मध्यवर्ती ठिकाणी सांस्कृतिक, सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी आधुनिक सभागृहे उपलब्ध करून देत, गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत व अभ्यासिका, तसेच रुग्ण साहित्य सेवा आणि वैद्यकीय मदत पुरविण्यात मंडळ अग्रेसर आहे. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व निर्भेळ खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणाऱ्या उद्योग मंदिर या उपक्रमाद्वारे गरजू महिलांना रोजगाराची संधी दिली जाते. गणेशोत्सव, शारदोत्सव आणि संक्रमण महोत्सवाच्या काळात विविध व्याख्याने, कीर्तने, प्रवचने व करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करून उदयोन्मुख कलाकारांना संधी देते.
हा सोहळा बुधवार दि. १० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता भवानी शंकर रोड, दादर, मुंबई पश्चिम येथील ब्राह्मण सेवा मंडळाच्या तळमजल्यावरील सभागृहात संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश देण्यात येणार असून पुढील काही रांगा राखीव असणार असल्याचे संस्थेचे प्रमुख कार्यवाह योगेश केळकर यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी