
गस्त वाढवली, गेवराई परिसरात घडलेल्या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला
बीड, 6 डिसेंबर (हिं.स.)। धुळे-सोलापूर महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून लुटमारीच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यातच गेवराई परिसरात दोन दिवसांपूर्वी तेलंगना येथील भावीक बीडमार्गे शिर्डीला जात असताना गेवराई-गढी प्रवासादरम्यान त्यांची लुटमार करण्यात आली. यात जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या घटनेनंतर संबंधित भाविकांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या घटनेची गंभीर दखल घेत गेवराई पोलीस ठाणे, बीड ग्रामीण पोलीस ठाणे, नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत गस्त वाढविल्या आहेत. तसेच या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला असून सर्वच विभागाला योग्य त्या सूचना पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केल्या आहेत.
खा. सोनवणेंचे एसपींना पत्र
धुळे-सोलापूर परिसरात वाढलेल्यां लुटमारीच्या घटना त्यातच गेवराई परिसरात शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. याचीच गंभीर दखल घेवून खा. बजरंग सोनवणे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांना पत्र देवून यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रवास करताना वाहनधारकांना सुरक्षित वाटावे या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने खबरदारी घेण्याचीही सूचना केल्या केल्या आहेत.
---------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis