
पुणे, 6 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका निवडणुकीची चाहूल लागल्यापासून शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची नेत्यांच्या घरी आणि पक्ष कार्यालयात अक्षरशः धावपळ सुरू झाली असून, गेल्या काही दिवसांत या हालचालींना विशेष वेग आला आहे. त्यात वरचेवर वरिष्ठ नेत्यांच्या शहरात फेऱ्याही वाढल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी, तर पक्ष कार्यालयांमध्ये सतत सुरू असलेली बैठकांचे सत्र असे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह इतर पक्षांमध्ये आतील स्पर्धा, गटा-तटांचे गणित, सोशल मीडिया टीम्सची हालचाल आणि भेटीगाठी हे सगळे आता एकाच वेळी सुरू असल्याचे दिसत आहे. तिकीट मिळवण्यासाठी अनेकांनी भूमिपूजनांचे कार्यक्रम, छोट्या पातळीवरील सभा, स्थानिक प्रश्नांवरील तत्पर प्रतिक्रिया, तसेच प्रभावी व्यक्तींना भेट देण्याची मालिका सुरू केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु