
सोलापूर, 6 डिसेंबर (हिं.स.)।
केंद्र शासनाने भारतमाला योजनाच रद्द केल्याने सुरत-चेन्नई महामार्गाचे काम लांबणीवर पडले आहे. आता सुरत-चेन्नई महामार्ग ग्रीनफिल्ड नाशिक ते अक्कलकोट (२२२ किमी) मार्ग बीओटी तत्त्वावर (बांधा, वापरा व हस्तांतर) देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळेल आणि प्रत्यक्षात नोव्हेंबर २०२६ पासून कामास सुरुवात होणार आहे.
उत्तर भारतातून येणाऱ्या जड वाहनांचा मुंबई, पुणे या शहरावरील ताण कमी करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनी सुरत-चेन्नई या महामार्गाची घोषणा केली, पण ज्या योजनेतून हा मार्ग होणार होता, ती योजनेची मदत २००४ मध्ये रद्द झाल्याने पुढील सर्व प्रक्रिया रखडली आहे. कर्नाटक व आंध्र प्रदेशात सुरत-चेन्नई मार्गाचे काम सुरू आहे तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव या जिल्ह्यासह आणखी काही जिल्ह्यात भूसंपादनातच ही प्रक्रिया रखडली आहे. आता या मार्गाचे टप्पे करण्यात आले असून, महाराष्ट्रात नाशिक ते अक्कलकोट या २२२ कि.मी.साठी मंजुरीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठी २ हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.नाशिक ते अक्कलकोट या २२२ कि.मी.चे काम सोलापूर विभागाकडे आहे. या मार्गास केंद्र शासनाकडून मंजुरीची घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मार्च २०२६ पर्यंत मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल. सोलापूर शहरासाठी बाह्यवळण मार्गाबाबत आताच काही सांगता येणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड