
ठाणे, 6 डिसेंबर (हिं.स.)। संगीत ही तपश्चर्या असून लहानपणापासून ज्यांचे संगीत ऐकत मोठे झाले, त्या संगीत भूषण पं. राम मराठे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी कृपाशीर्वादच आहे. हा आशीर्वाद मी हृदयाशी जतन करेन, यापुढे संगीताची साधना, सिध्दी आणि भक्ती करताना हा पुरस्कार मला निश्चितच प्रेरणा देईल असे वक्तव्य सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांनी ठाण्यात केले.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजीत 30 व्या संगीतभूषण पं राम मराठे महोत्सवाचे उद्घाटन आज राम गणेश गडकरी रंगायतन येथे झाले, यावेळी महापालिकेचे अतिरिक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, पं. मुकुंद मराठे, पं. विवेक सोनार, रवी नवले, पं राम मराठे यांच्या कन्या सुशील ओक, वीणा नाटेकर, गायत्री मराठे उपस्थित होते.
ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा संगीत भूषण पं राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांना प्रदान करण्यात आला. ५१ हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर संगीतभूषण पं. राम मराठे राज्यस्तरीय युवा पुरस्कार भारतीय नृत्यप्रकाराच्या युवा साधक निधी प्रभू यांना प्रदान करण्यात आला. रोख रूपये 25000 सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे आहे.
यावेळी आशा खाडिलकर यांनी पं. राम मराठे यांच्या आठवणींना उजाळा दिला. रामभाऊंचे ‘संगीत मानापमान’ हे नाटक मी पीठात बसून पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले. पं. रामभाऊ मराठे यांच्यासारखे कलाकार ईश्वरप्रेरित आणि साधना, तपश्चर्येतून घडलेली माणसे होती. शास्त्रीय गायक असणाऱ्या पं. राम मराठे यांना उपशास्त्रीय संगीताचाही बाज होता. पं. राम मराठे यांनी नाटकात,चित्रपटात कामे केली. त्या पिढीतल्या गायकांना प्रसिध्दीची अपेक्षा नव्हती. त्यांचे संपूर्ण आयुष्य हेच संगीत साधना करण्यात गेले आणि आता रामभाऊंचा शास्त्रीय संगीताचा वारसा त्यांच्या पुढील पिढ्याही समर्थपणे पुढे नेत आहे असून त्यांना मिळालेली ही ईश्वरी देणगी असल्याचे त्यांनी नमूद केले.
तर कथ्थक नृत्यांगनानिधी प्रभू सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या, 30 वर्षे ठाण्यात पं. राम मराठे यांचा महोत्सव सुरू आहे, मी शाळेत असताना हा कार्यक्रम पाहायला येत असे, त्यावेळी मला या रंगमंचावर कला सादर करण्याची संधी मिळेल का? असं सारखं वाटत असतानाच दोन वर्षापूर्वी या रंगमंचावर मला नृत्य करण्याची संधी मिळाली. त्यावेळी अनेकांना पुरस्कार घेताना वाटायंच. मला पण कधी ना कधी हा पुरस्कार मिळेल आणि आज माझं स्वपन् प्रत्यक्षात साकार झालं. राज्यस्तरीय युवा पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले, मी ठाणेकर आहे आणि गडकरी रंगायतन हे आमचं होम पीच आहे त्यामुळे या रंगमंचावर ठाणे महापालिकेने केलेला सन्मान स्वीकारताना मला अतिशय आनंद झाला आणि ज्यांची गाणी मी ऐकत आले त्या ज्येष्ठ गायिका यांच्या सोबत बसण्याचा आणि पुरस्कार स्वीकारण्याचा दुग्धशर्करा योग असल्याचे निधी प्रभू यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर