ब्लू फ्लॅग मानांकनासाठी श्रीवर्धन किनाऱ्यावर स्वच्छतेची लाट
रायगड, 7 डिसेंबर (हिं.स.)। श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ मानांकन मिळावे, या उद्देशाने मास्तेक फाउंडेशन आणि ग्रामीण प्रगती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता व जनजागृती मोहिमेला नागरिक व पर्यटक
A wave of cleanliness on Shrivardhan beach for Blue Flag rating


रायगड, 7 डिसेंबर (हिं.स.)। श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ मानांकन मिळावे, या उद्देशाने मास्तेक फाउंडेशन आणि ग्रामीण प्रगती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता व जनजागृती मोहिमेला नागरिक व पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक समुद्रकिनारा घडवण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

सकाळपासूनच स्वयंसेवक, युवक-युवती, महिला बचत गटांच्या सदस्यांनी समुद्रकिनाऱ्यावर एकत्र येत स्वच्छतेची मोहीम राबवली. प्लास्टिक कचऱ्याचे संकलन, कचरा विलगीकरण, ओल्या व सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन, तसेच समुद्री पर्यावरण संवर्धनाबाबत प्रत्यक्ष कृती करण्यात आली. या मोहिमेत सहभागी झालेल्या पर्यटकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत स्वच्छतेबाबत स्वतः पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली.

या मोहिमेचे आयोजन ग्रामीण प्रगती फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश डफळे आणि सौ. ज्योती डफळे यांनी केले. त्यांनी श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला जागतिक पर्यटन नकाशावर स्थान मिळण्यासाठी ‘ब्लू फ्लॅग’ मानांकनाचे महत्त्व विशद केले. स्वच्छता, सुरक्षितता, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग या निकषांची पूर्तता केल्यास श्रीवर्धनचा पर्यटन विकास वेगाने होईल, असे त्यांनी सांगितले.

दिवसभर चाललेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे समुद्रकिनारा अधिक स्वच्छ आणि सुंदर झाला असून, “स्वच्छ समुद्र – सुरक्षित पर्यटन” हा संदेश सर्वत्र पोहोचला आहे. श्रीवर्धनच्या शाश्वत विकासासाठी हा उपक्रम महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande