‘बांगलादेशी घुसखोर जन्म प्रमाणपत्र घोटाळा’ पुस्तिकेचे प्रकाशन
* राष्ट्रविरोधी शक्तींचा घोटाळा उघडकीला आणण्याचे सोमय्यांचे कार्य अभिनंदनीय - रविंद्र चव्हाण मुंबई, ७ डिसेंबर (हिं.स.) : ‘बांगलादेशी घुसखोर जन्म प्रमाणपत्र घोटाळा’ या माजी खा. किरीट सोमय्या यांच्या पुस्तिकेचे प्रकाशन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्
चव्हाण सोमय्या पुस्तक प्रकाशन


पुस्तक प्रकाशन


* राष्ट्रविरोधी शक्तींचा घोटाळा उघडकीला आणण्याचे सोमय्यांचे कार्य अभिनंदनीय - रविंद्र चव्हाण

मुंबई, ७ डिसेंबर (हिं.स.) : ‘बांगलादेशी घुसखोर जन्म प्रमाणपत्र घोटाळा’ या माजी खा. किरीट सोमय्या यांच्या पुस्तिकेचे प्रकाशन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत झाले. राष्ट्रविरोधी शक्तींचा जन्म प्रमाणपत्र घोटाळा शोधून काढणाऱ्या डॉ. सोमय्या यांचे अभिनंदन करत डॉ. सोमय्या यांनी संघर्ष आणि शोध घेत उघडकीस आणलेला हा घोटाळा या पुस्तिकेच्या माध्यमातून सर्वांसमोर आज येत असल्याबाबत श्री. चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला. पुस्तिकेच्या प्रकाशनावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ नेते मधु चव्हाण, राज पुरोहित, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, किरीट सोमय्या यांची राष्ट्राप्रती निष्ठा वाखाणण्याजोगी असून स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी वाचा फोडलेल्या बांगलादेशी-रोहिंग्यांच्या मुद्द्याला खऱ्याअर्थाने मार्गी लावण्याचे मोलाचे काम त्यांनी केले. मशिदी वरचे अनधिकृत भोंगे हटविण्यासाठीचा लढा यशस्वी केल्यानंतर डॉ. सोमय्या यांनी बांगलादेशी, रोहिग्यांचा जन्म प्रमाणपत्र घोटाळा शोधून काढला. राज्यात सव्वा दोन लाख बांगलादेशी आणि रोहिग्यांनी अवैध मार्गांनी जन्म प्रमाणपत्र मिळवले असल्याची धक्कादायक बाब त्यांनी पुराव्यानीशी प्रशासन आणि पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्याचे श्री. चव्हाण म्हणाले.

डॉ. सोमय्या यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे 25 शहरात 31 गुन्हे दाखल झाले आणि तब्बल 5 हजार आरोपीना अटक झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. झपाटल्यागत डॉ. सोमय्या अतिशय जोखमीचे काम करत असून जीवाला सांभाळून काम करा असा सल्लाही श्री. चव्हाण यांनी दिला. श्री. सोमय्या घुसखोर बांगलादेशी रोहिंगे यांच्या बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत करत असलेल्या कामाचे जनआंदोलन होण्याची गरज असून सर्व भारतीय तसेच सर्व राजकीय पक्षांनी या कामी त्यांची साथ द्यायला हवी, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.

यावेळी डॉ. सोमय्या म्हणाले की, बोगस जन्म दाखल्याबाबत 30 डिसेंबर 2024 रोजी पहिली तक्रार दाखल केली. 12 महिन्यांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने 2 लाख 24 हजार बोगस प्रमाणपत्र रद्द करण्यात आम्हाला यश आले आहे. यामध्ये 25 ते 65 वयोगटातील 97 टक्के बांगलादेशींचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. 5 हजार जणांना अटक झाली त्यातील काही जामीनावर सुटले आहेत. मुंबई मध्ये 1 हजार बोगस जन्म प्रमाणपत्र आढळून आली असून महापालिका आरोग्य विभागातील 3 अधिका-यांना अशी बोगस प्रमाणपत्र तयार करून दिल्याप्रकरणी निलंबित करण्यात आल्याचेही डॉ. सोमय्या म्हणाले. आम्ही मुंबईला भोंगामुक्त केले असून आता श्री. चव्हाण यांच्या परवानगी आणि साथीने 2026 मध्ये मुंबईला बांगलादेशी मुक्त करणार असा शब्द त्यांनी दिला.

महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाची स्पर्धा कोणाशीच नाही. किंबहुना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची गोल टोपी घालायची स्पर्धा सुरू आहे असा टोला त्यांनी लगावला. विरोधकांची बांगलादेशींना वाचवण्याची, अनधिकृत मशिद वाचवण्याची स्पर्धा सुरू आहे असा घणाघात श्री. सोमय्या यांनी केला. धारावीतील अनधिकृत मशिदीसाठी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी एका रात्रीत 25 हजार लोक गोळा केले याकडेही डॉ. सोमय्या यांनी लक्ष वेधले. नवीन बाबरी मशिद बांधायची स्पर्धा सुरू झाली असून सर्वांनी सतर्क रहायला हवे असाही इशारा दिला.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही डॉ. सोमय्या यांचे अभिनंदन केले. बांगलादेश सीमेवर ममता बॅनर्जी यांच्या वरदहस्ताने खोटी कागदपत्रे तयार केली जातात. खोटी प्रमाणपत्र बनवून अनेकांना मुंबई व आसाम मध्ये पाठवले जात आहे. हा मुद्दा श्री. सोमय्या यांनी लावून धरावा अशी विनंती श्री. लोढा यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande