
रत्नागिरी, 7 डिसेंबर, (हिं. स.) | पावस येथील स्वामी स्वरूपानंदांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भव्य बालदिंडी निघाली. रत्नागिरीतील लक्ष्मी चौक ते अध्यात्मंदिर या मार्गावरून निघालेल्या दिंडीत मुले उत्साहाने सहभागी झाली.
या भक्तीमय उपक्रमाचे संयोजन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने केले होते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बालदिंडीमध्ये रत्नागिरी शहरातील पालिका शाळांमधील बालवारकरी तसेच शहरातील खाजगी प्राथमिक शाळांमधील बाल वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. लहान-लहान वारकरी पारंपरिक वेशभूषेत, टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामस्मरण करीत मार्गक्रमण करत होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.
डोक्यावर तुळशीवृंदावन, हातात भगवे झेंडे, गळ्यात वीट-रुक्मिणीचा हार आणि मुखात “ज्ञानोबा-तुकाराम”चा जयघोष तसेच स्वामींच्या ओम राम कृष्ण हरीचा जयघोष अशी या बालवारकऱ्यांची रूपे भाविकांच्या मनाला भक्तीने भारावून टाकणारी होती. या उपक्रमातून लहान वयातच वारकरी संप्रदायाची शिकवण, संतांची परंपरा आणि नामस्मरणाचे महत्त्व बालमनावर बिंबविण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात आला. आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानप्रधान युगात मुलांना सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संस्कारांची जोड देणे अत्यंत आवश्यक बनले आहे. या दृष्टीने बालदिंडीसारखे उपक्रम समाजासाठी दिशादर्शक ठरत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी