
जळगाव, 7 डिसेंबर (हिं.स.) अजिंठा चौफुली परिसरातून बसमध्ये चढत असलेल्या यावल येथील शेख कलीम शेख इसाक (वय ५०) यांच्या खिशातून चोरट्यांनी १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. १ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या चोरीचा तपास सुरू असताना ५ नोव्हेंबरला एमआयडीसी पोलिसांनी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शेख कलीम हे यावल बसमध्ये चढत असतानाच गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या पँटच्या खिशातून रोकड काढली. काही क्षणांतच पैसे गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात शोधाशोध केली; मात्र रक्कम मिळाली नाही. त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली होती.तपासादरम्यान ही चोरी हमीद अयूब खान (वय २२, रा. जळगाव) व त्याच्या दोन साथिदारांनी केल्याचे उघड झाले.
तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध पुढील गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोहेकॉ गिरीश पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर