
मुंबई, 7 डिसेंबर (हिं.स.)। प्रीमियम मोटरसायकल निर्माता कंपनी केटीएमने आपल्या काही केटीएम 390 मालिकेतील मोटरसायकलसाठी रिकॉल जाहीर केला आहे. या रिकॉलमध्ये 2024 ते 2026 दरम्यानचे केटीएम 390 ड्यूक तसेच 2025-2026 केटीएम 390 Adventure R, 390 Adventure X, 390 Enduro R आणि 390 SMC R या मॉडेल्सचा समावेश आहे. भारतासह सर्व जागतिक बाजारपेठांमध्ये हा रिकॉल लागू करण्यात आला असून, काही मोटरसायकल्समध्ये कमी आरपीएमवर इंजिन अचानक बंद पडण्याची (स्टॉल) समस्या आढळून आली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अतिशय काटेकोर गुणवत्ता चाचणीदरम्यान एक दुर्मीळ परिस्थिती समोर आली असून त्यामुळे काही प्रकरणांमध्ये कमी वेगात इंजिन बंद होऊ शकते. जरी आतापर्यंत अशी फारच कमी प्रकरणे आढळली असली तरी संभाव्य धोका पूर्णपणे टाळण्यासाठी केटीएमने तात्काळ पावले उचलली आहेत. या अंतर्गत प्रभावित सर्व मोटरसायकल्सच्या इंजिन कंट्रोल युनिट (ECU) मध्ये सॉफ्टवेअर अपडेट करण्यात येणार आहे. या अपडेटमुळे कमी स्पीडवर किंवा गाडीचा वेग कमी करताना इंजिन बंद पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच, लो-एंड टॉर्क वाढेल आणि इंजिनची स्थिरता सुधारल्याने राइडिंगचा अनुभव अधिक सुरक्षित आणि स्मूथ होईल.
या रिकॉलअंतर्गत येणाऱ्या मोटरसायकल मालकांना कंपनीकडून पत्राद्वारे सूचना पाठवल्या जातील. संबंधित ग्राहकांनी अधिकृत केटीएम डीलरशी संपर्क साधून मोफत सॉफ्टवेअर अपडेट करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हे अपडेट पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. केटीएम 390 मालिकेच्या मोटरसायकलचे मालक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरील ‘सर्विस’ सेक्शनमध्ये आपली मोटरसायकल या रिकॉलच्या यादीत आहे की नाही, याची खात्री करू शकतात. कंपनीने ग्राहकांची सुरक्षितता आणि वाहनांची कार्यक्षमता सर्वोच्च दर्जावर राखण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule