
पणजी, 7 डिसेंबर (हिं.स.)।गोव्यातील एका नाइट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात अरपोरा-नागोआ पंचायतचे सरपंच रोशन रेडकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच नाइट क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
हे नाइट क्लब तात्पुरत्या बांधकामावर चालत होता आणि त्याच्या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात ताडाच्या पानांचा वापर झाला असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आग अतिशय वेगाने पसरली.गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, नाईट क्लबचे मालक आणि जनरल मॅनेजर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना अटक केली जाईल.
प्राथमिक चौकशीत नाइट क्लबमध्ये अनेक सुरक्षादोष असल्याचे समोर येत आहे—आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन आणि लोकांच्या सुरक्षेशी झालेली मोठी हलगर्जी यांचा समावेश आहे. याबरोबरच आर्पोरा नदीच्या बॅकवॉटरमध्ये उभारण्यात आलेल्या या क्लबचे बांधकाम देखील कथितपणे परवानग्याशिवाय करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. गोवा पोलिस प्रमुख आलोक कुमार यांनी सांगितले की सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याचे दिसते. परंतु अनेक प्रत्यक्षदर्शी सांगतात की आग प्रथम नाइट क्लबच्या पहिल्या मजल्यावर लागली, जिथे मोठ्या संख्येने पर्यटक नाचत होते.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की आग लागताच लोक घाबरून खाली धावले. काही लोक जेव्हा जिने उतरून ग्राउंड फ्लोरवर आले तेव्हा तेथील किचनमध्ये लागलेल्या आगीमुळे उठलेल्या धुरामुळे ते अडकले. ग्राउंड फ्लोरवर वेंटिलेशन नसल्याने अनेक लोक धुरात गुदमरले. त्यामुळे अनेक मृतदेह जिन्यांतूनच सापडले. नाइट क्लबचे प्रवेशद्वार आणि निर्गमद्वार खूपच अरुंद असल्याने लोक बाहेर पडू शकले नाहीत आणि गर्दीत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.
मिळालेल्या माहितीनुसार नाइट क्लब पाण्यावर उभारलेला होता आणि जमिनीशी फक्त एका अरुंद मार्गाने जोडलेला होता. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वीकेंड असल्याने नाइट क्लबमध्ये प्रचंड गर्दी होती आणि डान्स फ्लोअरवर जवळपास १०० लोक नाचत होते. मृतांमध्ये १४ नाइट क्लब कर्मचारी आणि ४ पर्यटक असल्याची पुष्टी झाली असून इतरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode